विठुनामाच्या गजरात वारकऱ्यांचा भक्तिमय प्रवास
| चिरनेर | प्रतिनिधी |
आषाढी एकादशीच्या निमित्ताने उरण तालुक्यातील विठ्ठलभक्तांनी गेल्या अकरा वर्षांपासून सुरू असलेली पंढरपूर वारीची अखंड परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवली. चिरनेर, पागोटे, दिघोडे, विंधणे, बोकडविरा-पागोटे आदी गावांतील विविध क्षेत्रांतील मित्रमंडळी एकत्र येत पंढरपूरच्या वारीत सहभागी झाली.
उरण एसटी आगाराकडून वारकऱ्यांसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली होती. आगार व्यवस्थापक तुषार गद्रे, डेपो इन्चार्ज रोहन खलीपे, वाहतूक नियंत्रक रोशन म्हात्रे व बांदल यांनी वारकऱ्यांना बस उपलब्ध करून दिली. वारीदरम्यान प्रसिद्ध ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक प्रमोद पाटील, नाट्यदिग्दर्शक संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते महेश लोहाटे व कांचन ठाकूर सहभागी झाले होते. विठुनामाच्या गजरात प्रमोद पाटील व संतोष ठाकूर यांनी नाट्यक्षेत्रातील अनुभवांचे किस्से सांगत नाट्यसंवाद सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले. प्रमुख कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
वारीत कांचन ठाकूर, हर्षदा ठाकूर, महेश लोहाटे, संतोष ठाकूर, कृष्णा कोळी, अशोक कोळी, सार्थक कोळी, शेखर मढवी, शैलेश कोळी, लक्ष्मी ठाकूर, केता कोळी, सुगंधा घरत, सुषमा कोळी, संतोष कोळी, रेखा गव्हाणकर, रामचंद्र कोळी, अनंत कोळी, राजेश घरत, अर्चना कोळी, नारायण पाटील, प्रकाश कोळी यांच्यासह अनेक भाविक सहभागी झाले. महिलांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता व पाण्याची व्यवस्था केली. सुषमा कोळी, श्वेता कोळी, सोनी कोळी, सार्थक कोळी व शेखर मढवी यांनी टाळ-मृदुंगाच्या साथीने भजने सादर करून वातावरण भक्तिमय केले.
‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’, ‘ज्ञानबा तुकाराम’, ‘राम कृष्ण हरी’ अशा नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने उरणच्या वारकऱ्यांनी भक्ती, सेवा आणि एकोप्याचा अनुभव घेत वारीचा मनमुराद आनंद लुटला. मानवी जीवनात ईश्वरी प्रेमाची अनुभूती देणारा वारीचा अनुभव आम्हाला ठायी ठायी आला, अशी भावना ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक प्रमोद पाटील, दिग्दर्शक संतोष ठाकूर, कांचन ठाकूर यांनी व्यक्त केली.
