| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 18 डिसेंबर 2022 रोजी पार पाडण्यात आल्या. या निवडणुकीत पागोटे ग्रामपंचायतीमध्ये बोगस मतदान झाल्याची तक्रार पागोटे ग्रामपंचायत येथील उमेदवार संपदा सुनिल तांडेल यांनी उरणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडे केली आहे.
पागोटे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रं.1मधील मतदार अपर्णा अजय ठाकूर पूर्वाश्रमिची अपर्णा तुळशीराम तांडेल यांनी ग्रामपंचायत पागोटे व ग्रामपंचायत भेंडखळ या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत एकाच दिवशी मतदान केले आहे. मनिषा सुनिल ठाकूर पूर्वाश्रमिची मनिषा तुळशीराम तांडेल यांनीही ग्रामपंचायत पागोटे व ग्रामपंचायत धुतुम या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी मतदान केले आहे. या शिवाय निताली विशाल ठाकूर पूर्वाश्रमिची निताली तुळशीराम तांडेल यांनी ग्रामपंचायत पागोटे व ग्रामपंचायत जसखार या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी मतदान केले असल्याची तक्रार संपदा तांडेल यांनी उरणच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केली आहे.
या बाबतचे पुरावेही तक्रारी सोबत निवडणूक अधिकार्यांकडे सादर केले आहेत. त्यामुळे पागोटे ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रं.1 मधिल निवडणूक निकालाच्या निर्णयाला स्थागिती देऊन पुन्हा मतदान घ्यावे. याशिवाय अशा प्रकारे आणखी काही मतदारांनीही असे बोगस मतदान केले आहे. त्याची तात्काळ चौकशी करून या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी मतदान करणार्या तथाकथित मतदारांवर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी पागोटे येथील ग्रामपंचायत उमेदवार संपदा तांडेल यांनी केली आहे.त्यामुळे उरणचे निवडणूक निर्णय अधिकारी या प्रकरणी चौकशी अंती कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.