। उरण । वार्ताहर ।
सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. भक्तजन बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गुंतले आहेत. गणरायाच्या आगमनानिमित्त आरास करण्यासाठी विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू बाजारपेठांमध्ये विक्रीकरिता उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ग्राहकांनी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
मखर सजावट, पानाफुलांच्या माळा, विद्युत रोषणाई अशा तर्हेतर्हेच्या वस्तूंनी उरण बाजारपेठ सजली आहे. प्लास्टिक बंदीमुळे कागदी, क्रेपपासून तयार केलेल्या फुलांच्या माळा, फुलांची कमान, पानांच्या वेली, विविध प्रकारच्या विद्युत रोषणाईचे तोरण ग्राहक विकत घेत आहेत. याशिवाय लाल, पिवळ्या, हिरव्या, गुलाबी अशा रंगीबेरंगी फुलांच्या माळा तसेच हिरव्या वेलीसारख्या माळा ग्राहकांनकडून खरेदीसाठी विशेष झुंबड उडत आहे. 50 रुपयांपासून 250 रुपयांपर्यत माळांचे दर सांगण्यात येत आहेत.
खर्या फुलांप्रमाणे दिसणारे कागदी, क्रेपच्या फुलांचे गुच्छ, ताटवे, कमान यांनाही सजावटीसाठी विशेष मागणी आहे. प्रत्येक भाविक आपल्या कल्पकतेने मखराची सजावट करीत असतात. गणेशमूर्तींच्या मागे सोडलेल्या पडद्यावर मोती, कुंदन, काचेच्या माळा, रंगीबेरंगी फुलांच्या तसेच लाईटींगची तोरणे सोडण्यात येतात. त्यामुळे मखराची शोभा वाढते. या माळा 25 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत विक्रीला उपलब्ध आहेत. पानाफुलांच्या माळांबरोबर विजेची तोरणंदेखील उपलब्ध आहेत. स्वदेशी तसेच चायनामेड माळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लवंगी, स्ट्रॉबेरी, अॅपल आदी आकारातील संगीत विद्युत माळाही बाजारात आल्या आहेत. 100 रुपयांपासून 4000 रुपये किमतीला या माळा उपलब्ध आहेत. फिरती छत्री, फिरते चक्र विक्रीसाठी असून, एलईडी व एलपीजीचे रंगीत दिवे, विविध रंगाचे फोकस मकराची अधिक शोभा वाढवीत आहेत. चायनामेड माळांपेक्षा स्वदेशी माळांचे दर अधिक असले, तरी चायनामेड खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद अत्यल्प आहे. स्वदेशी वस्तूंच्या विविध प्रकारच्या खरेदीवर ग्राहकांचा भर जास्त आहे.