। अलिबाग । प्रतिनिधी ।
बौध्द धम्माबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भारतीय बौध्द महासभेने पुढाकार घेतला आहे. महामानवाच्या जयंतीचे औचित्य साधत रायगड जिल्हयामध्ये रविवारी (दि.13) राज्यस्तरीय बोधीसत्व धम्मज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 21 ठिकाणी परिक्षा होणार असून या परीक्षेसाठी सुमारे 400हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
धम्मज्ञान परीक्षा चार गटामध्ये होणार आहे. पहिला गट पाचवी ते सातवी, दुसरा गट आठवी ते दहावी, तिसरा गट अकरावी ते बारावी आणि चौथा गट खुला वर्ग असे असणार आहे. जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील महाजने येथील बुध्दविहार, वाघोली येथील सारनाथ बुध्दविहार, सोगाव येथील तक्षशिला बुध्दविहार, बेलकडे येथील ज्ञानसागर बुध्दविहार, पेण तालुक्यातील पेण बुध्दविहार, कर्जत तालुक्यातील नेवाळी अवळस, किरवली, डिक्सल, खालापूर तालुक्यातील खोपोली येथील यशवंत नगर राजगिरी, सिध्दार्थ नगर, मोहनवाडी तक्षशिला, काटरंगमधील बोधिसत्व, विहारीमधील नालंदा, नवीन पोसरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, उरण तालुक्यातील जासई बुध्दविहार, पनवेल तालुक्यातील कोपर, आकुर्ली अपेक्षा कॉम्प्लेक्स, कामोठे येथील नालंदा, सुखापूरमधील तक्षशिला या बुध्दविहारांमध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहे.
परिक्षेच्या वेळी कोणताही गैर प्रकार घडू नये, यासाठी प्रत्येक केंद्रामध्ये परिक्षा केंद्र प्रमुख, परिक्षक व सैनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी भारतीय बौध्द महासभा उत्तर शाखा रायगडचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड व उषा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेऊन पुरुष व महिला पदाधिकारी तसेच सदस्यांना सुचना करण्यात आली आहे.