अंडर-14 कुमिते प्रकारात सुवर्णपदक
| वर्धा | प्रतिनिधी |
ठाणे-मुंबई येथील प्रियदर्शिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित 37 व्या ऑल इंडिया-इंटरनॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिपमध्ये पुलगावच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विविध पदकांची कमाई केली. या स्पर्धेत केनिया, भूतान, श्रीलंका यांसह विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पुलगाव येथील संजय खंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल, गुंजखेडा, पुलगाव येथील विद्यार्थी धनराज सिंग कंवर याने अंडर-14 कुमिते प्रकारात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे पुलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. पुलगावचा अथर्व बावणे याने काता प्रकारात सुवर्णपदक मिळविले. तसेच यवतकर, स्वयं गणवीर आणि शौर्य झामरे यांनी कुमिते प्रकारात रौप्यपदक पटकावले. नक्ष अंबादे, स्वराज मंडले, खुशी आत्राम आणि अमृता ढाणके यांनी कांस्यपदकाची कमाई केली. यवतमाळ जिल्ह्यातील सृष्टी कराटे क्लबच्या सेन्साई रोशनी तेलंगे यांच्या मार्गदर्शनाखालील खेळाडूंनीही स्पर्धेत यश मिळविले. आयुष कांबळे याने रौप्यपदक, तर प्रथमेश, स्वरा गावंडे आणि सुमय्या पठाण यांनी कांस्यपदक पटकावले. या सर्व खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालक, शिक्षक आणि क्रीडाप्रेमींनी त्यांचे कौतुक केले आहे.
