दिव्यांगाच्या प्रश्‍नांबाबत धरणे आंदोलन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शासनाच्या योजनेपासून अनेक दिव्यांग वंचित आहेत. दिव्यांग निराधार योजनेपासून पिवळी शिधापत्रिका व अन्य सुविधा मिळत नसल्याचा आरोप करीत दिव्यांगाच्या विविध प्रश्‍नांबाबत दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेच्यावतीने अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सोमवारी (दि.15) करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात घोषणा देत मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरु राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू करण्यात आला आहे. दिव्यांग व निराधार यांना मिळणार्‍या अनुदानात वाढ करून ती पाच हजार रुपये करण्यात यावी. दिव्यांगाच्या विकासाच्या योजनांचा लाभ देताना उत्पन्नाचा दाखल्याची अट रद्द करावी. अंत्योदय योजनेअंतर्गत पिवळी शिधापत्रिका देण्यात यावी. संजयगांधी दिव्यांग योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व अन्य योजनांचे अनुदान दर महिन्याला नियमीत करावे. मालमत्ता व घरपट्टी करात 50 टक्के सवलत मिळावी. ग्रामपंचायत व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांगाना 5 टक्के निधीचा लाघ मिळत नसेल, तर संबंधित अधिकार्‍यांवर फौजदारी गून्हे दाखल करावेत. व्यवसायासाठी जागा व स्टॉल, व्यवसाय परवाने देण्यात यावेत अशा अनेक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाबरोबरच सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.

Exit mobile version