| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्याने श्रीवर्धन शहरात बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गणेशोत्सवाचा उत्साह अधिक वाढवण्यासाठी आणि आरती, भजनांचा गजर घुमवण्यासाठी शहरात ढोलकी विक्रेते दाखल झाले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात श्रीवर्धन तालुक्यात प्रत्येक घरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये सायंकाळी होणाऱ्या आरती तसेच भजनांना विशेष महत्त्व असते. या भजनांमधील ताल धरण्यासाठी मृदुंग, पखवाज, तबला आणि ढोलकी यांसारख्या पारंपरिक वाद्यांना मोठी मागणी असते. हीच गरज ओळखून देवाची आळंदी येथून श्रीवर्धन येथे पारंपरिक कारागीर दाखल झाले आहेत.
या विक्रेत्यांकडे विविध आकारांच्या आणि उत्तम नाद असणाऱ्या ढोलकी उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी रंगसंगतीतील ढोलकीपासून ते भजनासाठी लागणाऱ्या मोठ्या, उत्तम कातड्याच्या ढोलकीपर्यंत अनेक प्रकार ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. एक हजार रुपयांपासून ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत ढोलकी उपलब्ध असून, नागरिक आणि भजन मंडळी खरेदीसाठी येत आहे.
लताबाई जगन्नाथ पवार
आम्ही देवाची आळंदी येथून श्रीवर्धनमध्ये वाद्ये विकण्यासाठी दरवर्षी येतो. आमचा हा पारंपरिक व्यवसाय आहे. मृदुंग, तबला, ढोलकी आणि पखवाज ही सर्व प्रमुख वाद्ये विक्रीसाठी आणली आहेत. यांची किंमत एक हजारपासून साडेतीन हजार रुपयांपर्यंत आहे.श्रीवर्धन येथे आल्यावर नेहमीच उत्तम अनुभव येतो. संपूर्ण तालुक्यातून नागरिकांचा आणि भजन मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
(देवाची आळंदी)
