। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील नाडसूर ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील धोंडसे गावाला स्वप्नातील गाव म्हणून नुकतेच प्रमाणित करण्यात आले आहे. विविध मानांकने व मापदंडात हे गाव अव्वल ठरले आहे. त्याचबरोबर गावात सर्वांगीण सोयी सुविधा तसेच रोजगार उपलब्ध झाला आहे.
यावेळी स्वप्नातील गाव नामफलक अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष भारती भोसले यांनी गाव विकास समितीने आपले स्वप्नातील गाव वाटचाल सुरू झाल्यापासून ते आज पर्यंतचे अनुभव सांगितले. तसेच, धोंडसे गावाचा स्वप्नातील गाव करण्याचा प्रवास मागील एक वर्षापासून सुरू झाला. दरम्यान ज्या समित्या स्वप्नातील गाव घोषित झाल्या त्यांना भेटी देऊन आपलेही गाव स्वप्नातील गाव करण्याच्या उद्देशाने गाव विकास समिती व ग्रामस्थांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या प्रयत्नांना खर्या अर्थाने यश येऊन वर्षभरात धोंडसे हे गाव स्वप्नातील गाव झाले आहे. स्वप्नातील गाव व कामे करत असताना स्वदेस फाउंडेशन तसेच शासनाच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले, असे मत ग्रामस्थांनी व महिला मंडळांनी व्यक्त केले आहे.
स्वप्नातील गाव नामफलक अनावरण कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाइस चेअरमन सुरेश खैरे, नगरसेवक पराग मेहता, तालुका कृषी अधिकारी अशोक महामुनी, सरपंच शाम खंडागळे, उपसरपंच ललिता ठोंबरे, सदस्य सारिका जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक स्वदेश फाऊंडेशन शिवदास वायाळ, सहाय्यक व्यवस्थापक रविंद्र राऊत, वरिष्ठ समन्वयक सोनाली पवार, वरिष्ठ समन्वयक सिद्धी भगत, संदेश जाधव, अविनाश खंडागळे, गोरख आघाव आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
उत्पन्न वाढीसाठी विविध प्रकल्प
गावामध्ये स्वदेस व शासन यांच्यामार्फत दुग्ध व्यवसाय वाढविण्याकरिता स्वदेश व शासनाच्या रॅड या प्रकल्प अंतर्गत गाई व म्हशी यांचे प्रकल्प देण्यात आले. तसेच, उत्पन्न दुपटीने वाढविण्याकरिता शेळीपालन, फळबाग लागवड, कुक्कुटपालन असे अनेक प्रकल्प गावात राबविण्यात आले, अशी माहिती अविनाश खंडागळे यांनी दिली.
गावाबरोरोबर शाळेचा विकास
गावाच्या विकासाबरोबरच जिल्हा परिषद धोंडसे शाळेला भौतिक सुविधा देऊन शाळेचा कायापालट करण्यास सहकार्य केले. स्वदेश फाऊंडेशन कडून शौचालय युनिट, वर्गसजावट, पाणी फिल्टर, एलसीडी टीव्ही, ग्रंथालय सेटअप, विज्ञान पेटी, सतरंजी इ. साहित्य शाळेला दिले, असे शिक्षक गोरख आघाव यांनी सांगितले.
स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनामुळे गावातील लोकांनी स्वच्छतेवर भर दिला. आरोग्य स्वच्छता व उपजीविका याविषयी अनेक उपक्रम स्वदेस फाउंडेशनच्यावतीने गावामध्ये राबवण्यात आले आहेत. शासनाच्या योजनममधील वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. महिलांचे नेतृत्व गावातील एकोपा या वैशिष्ट्यांमुळे स्वदेस व शासन यांच्या समन्वयाने स्वप्नातील गाव निर्माण झाले आहे.
विजय जाधव
