| उरण | प्रतिनिधी |
धुतूम गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यालगतचा सेवा मार्ग गेल्या काही वर्शांपासून अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. देशातील सर्वात मोठ्या बंदर उद्योगाला जोडणारा हा महामार्ग असला तरी या मार्गावर दिवसेंदिवस वाढत असलली अनधिकृत पार्किंग, बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या अवजड वाहनांमुळे आणि कंटेनर यार्डच्या बेफिकीर वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवाला कायमचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, धुतूम गावातील तब्बल 22 तरुण आणि नागरिकांनी या महामार्गावरील अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. ही बाब अत्यंत संतापजनक आणि वेदनादायी आहे.
2018 साली उरण सामाजिक संस्थेने दाखल केलेल्या जनहित याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट व मार्मिक नोंद करत प्रशासनाला कठोर आदेश दिले होते. मात्र आज, सात वर्षानंतरही परिस्थिती जशीच्या तशी आहे. मृत्यूच्या सावटाखाली नागरिक रोज प्रवास करीत आहेत, परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन यांच्या निष्क्रियतेमुळे या जीवघेण्या व्यवस्थेत काहीच सुधारणा झालेली नाही. धुतूम ग्रामपंचायतीचे सरपंच एस.पी. ठाकूर यांनी या गंभीर प्रश्नांची दखल घेत भारतीय रस्ते विकास प्राधिकरण यांच्या पनवेल येथील प्रकल्प संचालकांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात चिर्ले अंडरपास ते अंडरपास दरम्यानच्या रस्त्यावर आणि सेवा मार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, धुतूम अंडरपास परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी नियमानुसार 3 मीटर उंचीवर हाइटगेज बसविण्यात यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.







