| पनवेल | वार्ताहर |
पावसाळ्यातील साथरोग टाळण्यासाठी पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्यावतीने विशेष अतिसार पंधरावडा मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेची सुरूवात शुक्रवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, 2, 3, 4, 5, 6 अंतर्गत येणार्या शाळांमध्ये करण्यात आली. या मोहिमेचे उद्घान त्या त्या भागातील नगरसेविक आणि नगरसेविकांनी केले. खांदा कॉलनी येथील शाळांमध्ये नगरसेविका सारिका भगत आणि डॉ. आनंद गोसावी, डॉ. रेहाना मुजावर आणि डॉ. मनिषा चांडक यांच्या उपस्थित या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
दि. 1 ते 15 जुलैदरम्यान महापालिका क्षेत्रात आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार असून, त्यानुषंगाने पाच वर्षांआतील बालकांना ओआरएस पॉकिट आणि झिंक गोळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये पालिका क्षेत्रातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी हे घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करणार आहेत. तसेच स्वच्छता राखणे, स्वच्छ हात धुणे याचे प्रात्यक्षिकही आशा स्वंयसेविका व आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर शालेय विद्यार्थी, अंगणवाडी विद्यार्थ्यांसाठी शाळा व अंगणवाड्यांमधून जेवणापूर्वी व शौचा नंतर साबणाने स्वच्छ हात धुण्याच्या पद्धती व महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.