कोकणात जाण्याकरिता तिकीट मिळेना

Exif_JPEG_420

रोहा स्टेशनवरून तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांची नाराजी
नाराजी दूर करण्यास लोकप्रतिनिधी असफल

| आगरदांडा | प्रतिनिधी |
रोहा रेल्वे स्टेशनवरून कोकणात जाण्याकरिता लोकल तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचा लॉकडाऊन लागल्यापासून ते आजपर्यंत रोहा रेल्वे स्टेशनवरून कोकणात जाण्या-येण्याकरिता लोकल तिकीट प्रवाशांना बंद करण्यात आले आहे. यामुळे मुरुड व रोहा तालुक्यातील दररोज कोकणात प्रवास करणार्‍यांना नाईलाजाने बिना तिकीट प्रवास करावा लागत आहेत.

प्रवास करत असताना गाडीत चुकून टीसी आला तर आपलं काय होईल याचीही धास्ती त्यांना आहे. याची माहिती रेल्वे विभागाला असूनसुद्धा लोकल तिकीट का सुरू करीत नाही, हा प्रश्‍न सर्व प्रवाशांना पडला आहे. कोकणात जाण्या-येण्याकरिता लोकल तिकीट सुरू करण्याकरिता रायगड जिल्ह्याचे एक खासदार व सहा आमदार असून, यापैकी एकाही लोकप्रतिनिधीने यावर आवाज उठविला नाही. सर्व लोकप्रतिनिधी असफल ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.

कुडाळ रेल्वे स्टेशनवरून रोहा तिकीट मागितले तर तिकीट मास्टर सांगतो की, रोहा रेल्वे स्टेशनचे तिकीट मिळत नाही. तुम्हाला रोहा रेल्वे स्टेशनपासून पाच स्टेशन दुरचं तिकीट मिळू शकते. ही तर रेल्वे विभागाची लूट आहे. आम्ही तिकिटाचे पैसे जास्त का भरु. – रेल्वे प्रवासी

आपल्या रोहा रेल्वे स्टेशनवर कोकणात जाण्याकरिता लोकल गाड्या व दोन एक्स्प्रेस गाड्या थांबविल्या जातात. जर वरिष्ठांनी लोकल तिकीट सुरू करण्याचे आदेश दिले, तर तात्काळ तिकीट सुरू करू. – तिकीट मास्तर, रोहा

Exit mobile version