राष्ट्रवादीच्या सहभागाने भाजपा-शिंदे गटाची गोची

जुळवून घेण्यासाठी करावा लागणार प्रयत्न- आविष्कार देसाई

। रायगड । प्रतिनिधी ।

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत राज्यात चांगलाच भूकंप घडवून आणला आहे. या भूकंपाचे हादरे आता विविध ठिकाणी जाणवू लागले आहेत. पवार यांच्या गटामध्ये खासदार सुनील तटकरे आहेत, तसेच त्यांची कन्या आदिती तटकरे यांची थेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भाजपा आणि शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे. सध्या तरी त्यांना आता तटकरे यांच्यासोबत जुळवून घेण्यावाचून कोणताच पर्याय नसल्याचे दिसत आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आपली मंत्रीपदी वर्णी लागेल या आशेवर जिल्ह्यातील काही आमदार आहेत. मात्र, रविवारी अनपेक्षितपणे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्यातील भाजपा अथवा शिंदे गटाच्या एकाही आमदाराचा समावेश झाला नाही, तर सत्तेत सहभागी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला तब्बल नऊ मंत्रीपद बहाल करण्यात आली. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये चलबिचल वाढली आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये खासदार सुनील तटकरे यांचे राजकारण सर्वांनी अनुभवले आहे. ते जेव्हा सत्तेमध्ये असतात, तेव्हा जोमात असतात. प्रशासन त्यांना चांगले माहिती असल्याने कशा पद्धतीने कामे करायची, हे त्यांना चांगलेच अवगत आहे. सत्तेत राहून विरोधकांचा सहज गेम करता येतो. सत्तेमध्ये असल्याने ते जिल्ह्याच्या विकासावर प्रभावी काम करतील आणि अशा वेळी ते सोबत असलेल्यांनादेखील बाजूला करतील, अशी भीती त्यांच्यासोबत असणाऱ्या भाजपा आणि शिंदे गटाला वाटत नसेल तर नवलच म्हणावे लागेल. याआधी प्रशांत ठाकूर आणि रवींद्र पाटील हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस होती. तटकरेंचा चांगला-वाईट अनुभव त्यांनीदेखील घेतलेला आहे. आता एकत्र सत्तेत राहून मांडीला मांडी लावून बसावे लागणार असल्याने भाजपासह शिंदे गटाचीही चांगलीच गोची होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत कसे जुळवून घेणार हे पाहणे गरजेचे आहे. शिंदे-भाजपा-राष्ट्रवादी यांची महायुती आगामी निवडणुकीपर्यंत राहिल्यास रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार आहेत.

राज्याच्या राजकारणात रविवारी फार मोठा भूकंप झाला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोठेही असू दे, त्याचे परिणाम सर्वदूरपर्यंत जाणवणार आहेत. राजकारणामध्ये अशा घडामोडी या घडतच असतात. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्याने काय घडेल हे आताच सांगता येणार नाही. परिणाम कळण्यासाठी थोडे थांबावे लागणार असल्याचे मत भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी कृषीवलशी बोलताना व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय संपलेला आहे. त्यांची आता दोन शकले झाली आहेत. तटकरेंकडे मंत्रीपद गेल्याने फारसा फरक पडणार नाही, असे भाजपाचे पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी कृषीवलला सांगितले. रायगड जिल्ह्यातील भाजपाने याबाबत एकूणच सावध पवित्रा घेतला असल्याचे दिसत आहे.

शिंदे गटाची मात्र चांगलीच गोची झाली असणार. कारण, तत्कालीन मविआ सरकारमध्ये असताना शिंदे गटातील आमदार, मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये सहभागी झाल्याने भाजपा आणि शिंदे गटाची चांगलीच गोची झाल्याचे चित्र दिसत आहे.

Exit mobile version