दिघेंनी लेखनातून वाचकांना अंतर्मुख केले : कर्णिक

| खोपोली | प्रतिनिधी |

रघुनाथ वामन दिघे हे मराठीतील काळाच्या पुढे जाऊन लेखन करणारे साहित्यिक होते. त्यांच्या साहित्य लेखनाने मराठी वाचकांना कायमच अंतर्मुख केले आहे. कल्पनाविलास न मांडता सामाजिक बांधिलकीतून वास्तवाची स्पष्ट जाणीव दिघे यांच्या साहित्यातून व्यक्त होते. त्यामुळे त्यांचे लेखन मराठी रसिक वाचकांना कायमच नवी दृष्टी देत राहील, अशी भावना ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार हेमंत कर्णिक यांनी व्यक्त केली. कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा खोपोली आयोजित र.वा. दिघे यांची 130 वी जयंती व शाखेच्या 31 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक रामदास शेंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

आपल्या भाषणात कर्णिक यांनी दिघे यांच्या समग्र साहित्याचा आढावा घेताना लोकसंस्कृती, लोकजीवन, निसर्ग, माणूस, त्यांच्या समजुती, बोलीभाषा यांचा सर्जनशील आविष्कार दिघे यांच्या लेखनातून कसा व्यक्त होतो, याबद्दलची अभ्यासपूर्ण मांडणी केली. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील दिघे आपल्या कथा व कादंबऱ्यांतून समकालीन जीवनाबरोबरच काळाच्या पुढे जाणारा विचार व्यक्त करीत होते. दिघे यांचे साहित्य आशयाबरोबर लेखनशैलीच्या बाबतीतही समकालीन लेखनापेक्षा अनेक बाबतीत वेगळे होते, असे ते म्हणाले.

याप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषद केंद्रीय कार्यकारणी अध्यक्ष नमिता कीर, कोमसाप चे विश्वस्त प्रा.एल. बी. पाटील, जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी, अल्टा लॅबचे मॅनेजर बी.एस. म्हात्रे, र.वा. यांच्या स्नुषा व साहित्यिक उज्ज्वला दिघे, वामनराव दिघे, कवयित्री रेखा कोरे, खोपोली शाखाध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दीपप्रज्वलन व र.वा.दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत करून खोपोली शाखेची गेल्या 35 वर्षातली यशस्वी वाटचाल व सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती शाखेचे अध्यक्ष प्रकाश राजोपाध्ये यांनी आपल्या प्रस्ताविकातून दिली.

अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी र.वा. दिघे यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करून खोपोलीत साहित्य संस्कृतीचा वारसा जतन व्हावा, या उद्देशाने र.वा. दिघे यांच्या नावाने साहित्य भवन उभारण्याचा मानस व्यक्त केला. शाखेचे सदस्य व कवी अनिलकुमार रानडे यांच्या काव्य मौक्तिक या काव्यसंग्रहाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. जनता विद्यालयातून मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळून प्रथम आलेल्या श्रद्धा माने या विद्यार्थिनीला कै. भाऊसाहेब कुंटे स्मृती पारितोषिक देण्यात आले. शाखेच्या सहकार्यवाह व लेखिका सौ.जयश्री पोळ यांना दिघे परिवाराकडून दिला जाणारा कै.र.वा. दिघे स्मृती पुरस्कार देऊन पाहुण्यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

कोमसाप विश्वस्त व साहित्यिक प्रा.एल.बी.पाटील यांनी ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या प्रेरणेतून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या साहित्यिक कार्याची माहिती देत खोपोली शाखेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, लेखक कवी व गझलकार डॉ.सुभाष कटकदौंड, नगरसेवक व बांधकाम सभापती अनिल सानप त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जेष्ठ रंगकर्मी उल्हासराव देशमुख, प्रा. अण्णासाहेब कोरे, नगरसेविका प्रतीक्षा रेटरेकर, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुनिता चव्हाण, सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शेखर जांभळे, बूज हास्यक्लबचे अध्यक्ष बाबुभाई ओसवाल, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष एल. बी.पाटील यावेळी उपस्थित होते.

शाखेच्या सदस्या निशा दळवी, मधुमिता पाटील, अनिशा बिवरे, शर्वरी घुमरे, शितल अहेर यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. जनार्दन सताणे यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने उपस्थितांची मने जिंकली. डॉ. गणपती मुळीक यांनी कार्तिकी चित्रपटातील आगा ओ विठ्ठला हा अभंग सादर केला. शाखेचे कार्यवाह नरेंद्र हर्डीकर व खजिनदार प्रा.सुरेश चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाला खोपोली येथील विविध संस्थांचे पदाधिकारी, रसिक श्रोते, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखेचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. डॉ.भाऊसाहेब नन्नवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यवाह नरेंद्र हर्डीकर यांनी सर्वांचे आभार मानले. संतोष प्रधान यांनी गायलेल्या पसायदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगत झाली.

Exit mobile version