दिघी-मुंबई एसटीने घेतला पेट; प्रवाशांच्या खिडकीतून उड्या

Oplus_131072

नादुरुस्त वाहनांनी होतोय लांब पल्ल्याचा प्रवास

| दिघी | प्रतिनिधी |

राज्यभर सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने एसटी बस चर्चेचा विषय ठरत आहे. स्वारगेट बलात्कार प्रकरण असो वा अर्ध्या रस्त्यात बंद पडणे, चाक निखळणे, आग लागणे, यामुळे आता एसटीचा प्रवास धोकादायक झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. अचानक एसटीला आग लागल्याने पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे. दरम्यान, एसटीतून धूर येत असल्याचे समजताच भांबावलेल्या प्रवाशांनी जिवाच्या आकांताने खिडकीतून उड्या मारल्याची घटना मेंदडी स्थानकावर घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला असून, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समोर आले आहे.

श्रीवर्धन आगाराची दिघी-वडाळा एसटीतून अचानक चालकाच्या केबिनमधून धूर निघाल्याने प्रवाशांची गाडीतून उतरण्यासाठी धावाधाव झाली. रविवारी दिघी बसस्थानकातून दिघी-वडाळा जाणारी गाडी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते. एसटीत होळीच्या उत्सवानंतर परतीच्या प्रवासात निघालेल्या चाकरमान्यांची हाऊसफुल्ल गर्दी होती. दिघी सोडल्यानंतर मेंदडी स्थानकावर गाडी थांबली. पुन्हा पुढच्या प्रवासाला निघण्यापूर्वी अचानक या गाडीतून धूर येऊ लागला. गाडीमध्ये सर्वत्र धूर झाल्याने प्रवासी घाबरले. त्यानंतर प्रवासी भयभीत होऊन मिळेल त्या वाटेने गाडीच्या बाहेर पडू लागले. उतरण्यासाठी दरवाजात गर्दी झाल्याने काहींनी खिडक्या व चालकाच्या केबिनमधून उड्या मारल्या. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गाडीतून सर्व प्रवासी उतरल्यानंतर काही वेळाने धुराचे लोट कमी झाले. गाडीतील इंजिनजवळील पार्टमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. या दिवसात जिल्ह्यामध्ये वाहनांना आग लागण्याच्या चार धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. श्रीवर्धन आगाराच्या नादुरुस्त वाहनांच्या अशा घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे सावट आहे. एक तर कित्येक वर्षे नवीन गाड्यांची सुविधा नाही. नियमित लांब पल्ल्याच्या सोडण्यात येणार्‍या गाड्यांची देखभाल दुरुस्ती नसून, आता तरी सुखकर प्रवास मिळावा, अशी मागणी श्रीवर्धनवासीय करत आहेत.


स्टार्टरमधील बिघाडामुळे आतील पार्ट जळून धूर निघाला आहे. या घटनेने प्रवाशांनी घाबरून जाऊ नये. आगाराकडून सुरक्षित प्रवास देण्याचे नेहमी प्रयत्न केले जातील.

महेबुब मनेर,
आगार प्रमुख, श्रीवर्धन

Exit mobile version