‘अभी 11’ ची विजयी सलामी; मेडिकल कॉलेज अलिबाग संघाचा 96 धावांनी पराभव
। अलिबाग । क्रीडा प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील खानावच्या नवतरुण स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडांगणावर अॅड.गौतमभाई पाटील (अध्यक्ष जनता शिक्षण मंडळ) टी 20 लेदर बॉल क्रिकेट प्रीमियर लीगला काल दि.16 मार्च रोजी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड.गौतम पाटील, खानावचे माजी सरपंच व नवतरुण स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र गोंधळी आरडीसीएचे सहसचिव जयंत नाईक, राजेंद्र ठाकूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सध्या अलिबाग तालुक्यात टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वत्र धुमाकूळ सुरू असताना लेदर बॉल क्रिकेटला चालना मिळावी व तालुक्यातील क्रिकेटपटूंना चांगले व्यासपीठ मिळावे ह्या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे.
स्पर्धेत अलिबाग तालुक्यातील निमंत्रित 12 संघांचा सहभाग असून स्पर्धा पांढर्या चेंडूवर व रंगीत गणवेश परिधान करून खेळविली जाणार आहे. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन अभिजित तुळपुळे स्पोर्ट्स क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या विजयी संघाला रोख रुपये 50 हजार व आकर्षक चषक तर उपविजयी संघाला रोख रुपये 25 हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे स्वरूप प्रथम लीग व त्यानंतर बाद फेरीनुसार असणार आहे. स्पर्धेचा उदघाटनीय सामना अभी 11 अलिबाग विरुद्ध मेडिकल कॉलेज अलिबाग या दोन संघांमध्ये खेळला गेला. त्यामध्ये अभी 11 संघाने मेडिकल कॉलेज अलिबाग संघाचा 96 धावांनी पराभव केला असून अष्टपैलू खेळाडू सचिन घरत याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी अॅड.गौतम पाटील यांचे अलिबाग तालुक्यात लेदर बॉल क्रिकेटला नव संजीवनी दिल्याबद्दल आभार मानले व त्यांनी भविष्यात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनसाठी आपले योगदान द्यावे, असे मत व्यक्त केले.