धोकादायक विद्युत खांब बदलला

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

टपाल नाका परिसरातील एमएसईबी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेला राणा कन्स्ट्रक्शन ट्रान्सफॉर्मर सेंटर डीपी स्ट्रक्चरचा विद्युत खांब अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचला होता. खांब पूर्णपणे सडल्याने तो कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्पर पाठपुराव्यामुळे महावितरणने अवघ्या 24 तासांत नवीन विद्युत खांब उभारून संभाव्य जीवितहानी टाळली.

रोहिदास वाड्यातील रहिवासी सचिन उरणकर आणि जयेश कल्याणकर यांनी धोकादायक खांबाची पाहणी करून त्याचे छायाचित्र व व्हिडिओ तयार केले. त्यानंतर त्यांनी नगरसेवक राजू सोनी, प्रभाग अध्यक्ष पवन सोनी आणि मंदार देसाई यांच्याशी संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी केली. तक्रारीची दखल घेत राजू सोनी, पवन सोनी आणि मंदार देसाई यांनी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सातपुते यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. यानंतर अतिरिक्त कार्यकारी अभियंता सातपुते यांनी तातडीने संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. महावितरणच्या पथकाने युद्धपातळीवर काम करत अवघ्या एका दिवसात जुना व सडलेला विद्युत खांब हटवून त्या ठिकाणी नवीन खांब उभारला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधील भीती दूर झाली.

Exit mobile version