रेवदंड्यात शिवकालीन तोफांची दुरवस्था

ग्रामपंचायतीविरोधात संताप उसळला

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

रेवदंडा ग्रामपंचायतीसमोर ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक तोफांची अत्यंत वाईट अवस्था झाल्याचे समोर आले आहे. या तोफांभोवती कचरा आणि भाजीपाल्याच्या गाठोड्यांचा साठा करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

आगरकोट किल्ल्यातून आणलेल्या या तोफा नवीन ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटनावेळी अभिमानाचे प्रतीक म्हणून येथे स्थापित करण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या त्यांची उपेक्षा होत असून, परिसर कचराकुंडीप्रमाणे वापरला जात असल्याचे दिसून येत आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर निष्काळजीपणाचा आरोप करत, “कर वसूल केला जातो, मात्र स्वच्छता आणि वारसा जपण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही,” अशी टीका केली आहे. इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या तोफा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक मानल्या जातात. अशा वारशाची होणारी उपेक्षा ही गंभीर बाब असून, याबाबत ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, संबंधित विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन तोफांची साफसफाई, संवर्धन आणि संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

शिवकालीन तोफांवर भाजीपाला व कचरा ठेवणे अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. ग्रामपंचायत कर आकारते, पण वारसा जपण्याबाबत पूर्णपणे उदासीन दिसते.

निलेश खोत,
सामाजिक कार्यकर्ते

या तोफा मराठ्यांच्या शौर्याची साक्ष आहेत. त्यांची अशी दुरवस्था होणे खेदजनक आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिसर स्वच्छ करावा आणि तोफांचे जतन करावे.

प्रमोद नवखारकर,
सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version