मातंग समाजाच्या शौचालयाची दुरवस्था

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन परिवहन स्थानकापासून मेटकरणी या ठिकाणावरून आराठी ग्रामपंचायतीची हद्द सुरू होते. आराठी येथे असलेल्या शबिनाऑटोमोबाईल्स या पेट्रोल पंपाच्या मागे अत्यंत गरीब असलेल्या मातंग समाजाची वस्ती आहे. या ठिकाणी असलेला मातंग समाज रोज मजुरी करून आपले पोट भरत आहे. परंतु या समाजाला आपल्या हक्काचे सार्वजनिक शौचालय देखील ग्रामपंचायतीकडून दुरुस्त करून मिळत नसल्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

राज्यामध्ये सर्वत्र हागणदारी मुक्त गाव योजना यशस्वीपणे राबविली जात असताना, श्रीवर्धन तालुक्यात मात्र या योजनेला हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सदरचे मातंग समाजाचे सार्वजनिक शौचालय हे अत्यंत जुने असून, या शौचालयाचा दरवाजा तुटून गेलेला आहे. तसेच या शौचालयाची टाकी देखील फुटलेली आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्रीवर्धन पंचायत समिती तसेच रायगड जिल्हा परिषद यांनी याबाबत तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.

आराठी ग्रामपंचायत याकडे अनेक वेळा अर्ज, विनंती करून सुद्धा सदरचे शौचालय दुरुस्त करणे किंवा या ठिकाणी नवीन शौचालयांची निर्मिती करणे याकडे ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे.

सतिश भिसे
अध्यक्ष मातंग समाज
Exit mobile version