माणगाव पोलीस वसाहतीची दुरवस्था; कर्मचारी भाड्याच्या खोलीत

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची पडझड झाली असून या वसाहतीची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही  दुरवस्था झाली आहे. विकासाचा अजेंडा  घेवून राज्यात विविध कामे हाती घेऊन निघालेल्या तीन पक्षीय युती सरकारने माणगाव येथील पोलीस वसाहतीतील कर्मचारी, अधिकाऱ्यांची निवास बांधकाम करण्याकडे गेली अनेक दिवसापासून पाठच फिरवली आहे. सध्या हे कर्मचारी भाड्याच्या खोलीत राहत आहेत.

ब्रिटीश काळापासून उभे असलेले माणगाव येथील पोलीस ठाणे आणि त्या पोलीस ठाण्याजवळच असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी बांधलेले निवास आजही स्वातंत्र्यानंतर उभे आहे. मात्र शेकडो वर्षांपूर्वीच्या निवासाची दुर्दशा झाली असून या निवासात कोणीही पोलीस कर्मचारी राहत नसल्याने पोलीस निवास भूतबंगलाच बनले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व शासनाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही माणगाव वसाहतीची उपेक्षा कायम आहे. माणगाव पोलीस ठाणे अंतर्गत १४० गावांचा समावेश आहे. यासाठी येथे सुमारे ६८ अधिकारी व कर्मचारी वर्ग काम करीत आहेत.

 ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. नागरिक आणि कायद्यांच्या रक्षणासाठी पोलिसांचे योगदान महत्वाचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात माणगाव येथे १९१८ – १९ मध्ये दगडी चिऱ्यांमध्ये केलेले पोलीस चौकीच्या बांधकामाला १०४ वर्षे पूर्ण होवून गेली. ही पोलीस चौकी आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. या चौकी जवळच त्यावेळी ब्रिटीश सरकारने निवासस्थान उभारले होते. माणगाव पोलीस वसाहतीत राज्य सरकारने निवासस्थानाच्या वेळोवेळी दुरुस्त्या केल्या. मात्र ही निवासस्थाने दुरुस्त करण्याऐवजी ती पाडून नव्याने बांधणे गरजेचे होते. मात्र याकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

माणगाव पोलीस ठाण्यात १९६७ – ६८ मध्ये पोलीस अधिकाऱ्यांसाठी एक निवासस्थान तर २ चाळीमध्ये २६ कर्मचारी राहत होते. सन १९८५-८६ मध्ये तिसरी चाळ बांधण्यात आली. यात १२ निवासस्थाने बांधण्यात आली होती. त्यात १२ पोलीस कर्मचारी राहत होते. या तीनही चाळींचे क्षेत्र ७०८१.४० चौरस मीटर असून ही जागा शासनाची आहे. या निवासस्थानाची दुरुस्त्या २०१५ पूर्वी वेळोवेळी करण्यात आल्या. हे बांधकाम खूप जुने असल्यामुळे रस्त्यासाठी भराव आणि  भिंतीमध्ये ओलावा निर्माण होवून या चाळी नादुरुस्त होत गेल्या. गेल्या तीन वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने निवासावरील पत्रे उडाले, भिंती पडल्या.  यामुळे दोन वर्षात या पोलीस निवासी संकुलाचे प्रचंड नुकसान झाले असून दयनीय अवस्था झाली आहे. या पोलीस वसाहतीचे काम लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे.

Exit mobile version