। माणगाव । प्रतिनिधी ।
स्वतंत्रपूर्व काळापासून उभे असलेल्या माणगाव येथील पोलीस कर्मचार्यांच्या निवासाची पडझड झाली होती. या वसाहतीची गेले अनेक दिवसापासून दुर्दशा झाल्यामुळे हे निवासस्थान भूतबंगालच बनले होते. सरकारने येथील पोलीस वसाहतीतील कर्मचारी, अधिकार्यांची निवास बांधकाम करण्याकडे गेली अनेक दिवसापासून पाठच फिरवली होती. त्यामुळे हे निवासस्थान दुर्लक्षित राहिले. इथल्या राज्यकर्त्यांच्या आकसामुळे पोलीस ठाणे 100 वर्षानंतरही इंग्रज सरकारनी बांधलेल्या इमारतीतच आजपर्यंत चालत होते. तर, निवास मोडकळीस आल्याने कर्मचार्यांना भाड्याच्या खोलीत आश्रय घ्यावा लागत होता. नागरीक व प्रसिद्धी माध्यमांनी यावर आवाज उठवल्यामुळे माणगाव पोलीस ठाण्याला नवीन स्वंतत्र व सर्वसोयींनीयुक्त इमारत मिळणार आहे. तसेच, कर्मचार्यांचे निवासही प्रशस्त जागेत उभारण्यात येणार आहे.







