वेनगाव स्मशानभूमीची दुरवस्था

निवारा शेड बनला मद्यपींचा अड्डा

। वेनगाव । वार्ताहर ।

कर्जत तालुक्यात वेनगाव येथील स्मशानभूमीतील निवारा शेड दारुड्यांचा अड्डा बनला आहे. ही स्मशानभूमी गावाबाहेरच्या मुख्य रस्त्यालगत एकांतात असल्यामुळे तसेच ग्रामपंचायतीचे कोणत्याही प्रकारची देखरेख नसल्यामुळे येथील निवारा शेडचा काहीजण येथे बसून दारू पिण्यासाठी वापर करतात. दारू पिल्ल्यानंतर दारू व पाण्याच्या बाटल्या, ग्लास, खाऊची रिकामी पाकिटे हे सर्व तिथेच टाकून जातात. यामुळे निवारा शेडमध्ये कचरा व दुर्गंधी पसरल्याने निवराशेडची दुरवस्था झालेली आहे.

वेनगाव ग्रामपंचायतीचे स्मशानभूमी परिसरात दुर्लक्ष असून येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, स्मशानासाठी लागणारी लाकडे साठवून ठेवण्यासाठी साठवण खोली आहे. पण त्या खोलीत लाकडेच नसतात. गावात एखादे मयत झाले तर बाहेरून लाकडे मागावी लागतात. तसेच, या खोलीला व निवारा शेडच्या दरवाजांना कुलूप नाही. यातच ग्रामपंचायतीची देखरेख नसल्याने, तसेच इतर दिवशी कोणी इकडे फिरकत नसल्याने दारू पिणार्‍या लोकांना मोकळीक मिळत आहे. अशातच चांगल्या निवारा शेडची दुरवस्थादेखील झालेली आहे. स्मशानभूमीच्या वरचे पत्रे उडाले असल्याने येथे पावसात खुप मोठी गैरसोय होते. अशा एक ना अनेक समस्यांची गैरसोय पाहायला मिळत आहेत. तरी ग्रामपंचायतीने लक्ष घालून उद्भवणार्‍या समस्यांचे निवारण करण्यात यावे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

Exit mobile version