। पनवेल । वार्ताहर ।
कळंबोली वसाहतीमधील विसर्जन तलावाजवळील रोडपाली व कळंबोली येथील स्मशानभूमी चे निवारा शेड जीर्ण झाले आहे. ते पाडण्याची मागणी रामदास शेवाळे यांनी पनवेल महापालिकेकडे केली आहे. अन्यथा शिवसेना ती पाडून स्वखरचाने निवारा शेड उभारेल असा इशारा त्यांनी दिला आहे .
सिडकोने सुरूवातीला कळंबोली येथील सेक्टर 12 या ठिकाणी स्मशानभूमी उभारली आहे. त्या ठिकाणी शोकसभा, प्रार्थना तसेच विधी करण्याकरीता निवारा बांधण्यात आला होता. त्याच्या डागडुजीकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता या ठिकाणचा स्लॅब कधी कोसळेल याची शाश्वती देता येत नाही. त्याला लोखंडी खाबांचा टेकू देण्यात आला असून ते टेकू ही गंजलेले आहेत. त्याचबरोबर भिंतीला मोठमोठे तडे गेले आहेत त्यामुळे ही वास्तु धोकादायक असल्याची स्थिती आहे. कामगारांना बसण्यासाठी जो निवारा आहे त्याचीही दुरावस्था झालेली आहे. पावसाळयात तर त्याला गळती लागते त्यामुळे स्मशानात काम करणार्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. अशाप्रकारे धोकादायक झालेले बांधकाम कधीही कोसळू शकते. जर पनवेल महानगर पालिकेने जीर्ण झालेला तसेच मोडकळीस आलेली निवारा आठ दिवसात जमीनदोस्त केला नाही तर शिवसेना स्वखर्चाने धोकादायक झालेले हे बांधकाम काढून टाकेल, असा इशारा शेवाळे यांनी महापालिकेला दिला आहे. या वेळी डी.एन.मिश्रा, तुकाराम सरक, सूर्यकांत म्हसकर, श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, रोहन शिरसाट, रणजित फडतरे, नितिन गुलदगड आदी उपस्थित होते.