| पनवेल | प्रतिनिधी |
जून महिना अर्ध्यावर आला असतानाही पनवेल परिसरात वरुणराजाने अद्याप जोरदार हजेरी लावलेली नाही. आकाशात दररोज काळे ढग जमा होत असून पावसाची चिन्हे दिसत आहेत; मात्र, अपेक्षित असा धो-धो पाऊस अद्याप कोसळलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पावसाबाबत उत्सुकता आणि चिंता दोन्हीही वाढल्या आहेत. पनवेल तालुक्यातील बळीराजा मात्र पावसाची वाट पाहत न बसता शेतीच्या कामांमध्ये व्यस्त झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी भाताच्या पेरणीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे शेतात टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच दहाड (भात रोपवाटिका) तयार करण्याची कामेही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पावसाच्या आगमनापूर्वी शेतांची मशागत, बांधबंदिस्ती आणि अन्य पूर्वतयारीची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. कृषी साहित्य, बियाणे व खतांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्येही शेतकऱ्यांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.







