पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचविणार – दिनेश गुगले

। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव तालुक्यातील निळगुन गावचे दिनेश गुगले गेली अनेक वर्षे तालुक्यात शेकापचे प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांनी देगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काही वर्ष चांगल्या प्रकारे काम केले. तसेच पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम ते तालुक्यातील विविध शाळांमधून राबवित असतात. पक्षाचा इमाने इतबारे काम करीत असताना पक्षसंघटनेचा नावलौकिक व्हावा हा उद्देश नजरेसमोर ठेवून ते गेली अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्यात काम करीत आहेत. शेकापचे सर्वेसर्वा आ. जयंत पाटील यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून ज्येेष्ठ नेते अस्लम राऊत व तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ते बहुजन समाजात काम करीत आहेत. त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास दाखवून पक्षश्रेष्ठी आ. जयंत पाटील यांनी दिनेश गुगले यांची पक्षाच्या रायगड जिल्हा चिटणीस मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

गुगले यांच्या निवडीबद्दल पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच विविध पक्षातील मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या या निवडीबद्दल प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना गुगले म्हणाले की, माझ्यावर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवून जिल्हा चिटणीस मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करून मला जनसेवा करण्याची व विकासकामे करण्याची संधी दिल्याबद्दल मी आ. जयंत पाटील व पक्षाच्या सर्व ज्येेष्ठ मंडळींचे आभार व्यक्त करतो. यापुढेही आपण पक्षश्रेष्ठी यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शक राऊत व तालुका चिटणीस मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे काम प्रामाणिकपणे करून पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली.

Exit mobile version