दीडशे वर्षांनंतर लागला दिशादर्शक फलक

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे स्थानक 1860 साली सुरू झाले. मात्र, या स्थानकावर पूर्व दिशा कोणती व पश्‍चिम दिशा कोणती, असा संभ्रम नवीन प्रवाशांना पडत असे. मात्र, याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन कर्जत रेल्वे स्थानकावर दिशा दर्शविणारे फलक सुमारे 163 वर्षांनी लावण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना सोयीचे झाले आहे.

मुंबई-ठाणे रेल्वे धावल्यानंतर प्रथम 1859 साली पळसदरी रेल्वे स्थानक निर्माण झाले. त्यानंतर 1860-61 मध्ये कर्जत रेल्वे स्थानकाची निर्मिती झाली. त्यानंतर अगदी फलाट वाढले, स्वयंचलित जिने आले, अनेक सुविधा झाल्या; परंतु कर्जत रेल्वे स्थानकात पूर्व दिशा कोणती व पश्‍चिम दिशा कोणती, असा प्रश्‍न नवीन प्रवाशांना पडत असे. कर्जत तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने शनिवार व रविवारी प्रचंड गर्दी रेल्वे स्थानकावर होत असते. त्यामुळे नवीन प्रवासी व पर्यटकांमध्ये दिशेबद्दल संभ्रम होत असे. ही बाब ओसवाल यांच्या लक्षात आली व त्यांनी पाठपुरावा सुरू केला. त्याला यश येऊन दिशादर्शक फलक लावण्यात आले.

दिशादर्शक फलक लावल्या असल्याने बाहेरून येणार्‍या प्रवाशांची व पर्यटकांची चांगली सोय झाल्यामुळे रेल्वे प्रशासनाचे खूप खूप धन्यवाद.

पंकज ओसवाल,
सामाजिक कार्यकर्ता, कर्जत

Exit mobile version