दिव्यांग शेतकरी अजूनही उपेक्षितच

उपोषणाला आठ दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही नाही; प्रकृती खालावल्याची माहिती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

लाडीवली येथील जागेतून लोना कंपनीने सांडपाण्याची वाहिनी टाकल्याचा आरोप करीत दिव्यांग शेतकरी गणेश म्हामणकर यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचे उपोषण सुरू असूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, उपोषणामुळे म्हामणकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवेदनातून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश म्हामणकर हे दृष्टीहीन दिव्यांग शेतकरी आहेत. लाडीवली येथील त्यांच्या स. नं. 34/8 अ या जागेतून लोना इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड या कंपनीने सांडपाणी वाहून नेण्यासाठी वाहिनी टाकली आहे. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ही वाहिनी टाकण्यात आल्याचा आरोप म्हामणकर यांनी केला आहे.

याप्रकरणी न्याय मिळविण्यासाठी गणेश म्हामणकर यांनी अखेर जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार (दि. 28) पासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आठ दिवस उलटूनही जिल्हा प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार म्हामणकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे.

उपोषणाला बसलेले गणेश म्हामणकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची विनंती केली आहे. मात्र, ते उपचारासाठी दाखल होण्यास तयार नाहीत. त्यांची वेळोवेळी तपासणी केली जात आहे.

डॉ. शीतल जोशी,
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याची बैठक लावली होती. चौकशी करून अहवाल दिला जाईल, अशी त्यांना ग्वाही दिली आहे. साधारणपणे ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे तूर्तास उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांना केली आहे.

संदेश शिर्के,
निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड
Exit mobile version