‘आशा’ची निराशा; शेकाप उठविणार आवाज

चित्रलेखा पाटील यांची घेतली भेट

। अलिबाग । प्रतिनिधी ।
तिशीतील असो वा साठीतील, कोरोना काळात जीवावर उदार होऊन, घरोघरी जाऊन रुग्णांची खात्री केली, दवाखान्यात दाखल केले, गरोदर मातांना बालकांसह वाचविण्यासाठी जीवाचे रान केले, खाचखळगे खात, डोंगरकडे पार करुन आदिवासी महिलांना मार्गदर्शन केले, अशा घटकाला म्हणजेच आशा वर्करना डॉक्टरांकडून, वरिष्ठांकरुन हीन वागणूक देऊन त्यांना निराश करण्याचे काम जिल्हा आरोग्य प्रशासन करीत आहे. आशा सेविकांच्या अन्यायाविरोधात शेकाप आवाज उठविणार, अशी ग्वाही महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी दिली.

रोज किमान पन्नास घरात, तेही स्वतःच्या खर्चाने जात रुग्णांना शोधायचे, वजन करायचे, ताप-श्‍वास मोजायचे, त्यांच्या नोंदी करणे, रुग्ण दवाखान्यात दाखल करणे आणि गणवेश परिधान केला नाही म्हणून वरिष्ठांनी प्रवेशद्वाराजवळ अडवणे, ही आडमुठेगिरी असल्याचा आरोप आशा वर्करने केला आहे. अनेक योजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणारा आरोग्य विभाग आशांचे मानधन किंवा प्रोत्साहन भत्त्यासाठी मात्र अडून बसला आहे. ग्रामीण महाराष्ट्रात आशांच्या कार्याचे कौतुक होत असताना, त्याच वर्गाला आरोग्य विभागाकडून हीन वागणूक दिली जात आहे.

वरिष्ठांची हुकूमशाही
2019 पासून 2022 या कालावधीत केवळ सहा हजार रुपये देण्यात आले आहेत. याबाबत कोणीही दखल घेत नसल्यामुळे राजीनामा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोही स्वीकारला जात नाही. अनेकदा धमकी देऊन राजीनामा घेण्यास टाळाटाळ केली जाते. काम वेळेत नाही केले तर पोलिसांना बोलावून अटक वॉरंट जारी करण्याचीही धमकी तत्कालिन नायब तहसीलदारांनी दिल्याचे आशा वर्करने सांगितले. त्यामुळे या हुकूमशाहीमुळे काम करणे कठीण झाल्याचे त्यांनी स्पष्टच सांगितले.

लाडू आणि चिवडा तोंडातून काढू
ऐन दिवाळी तोंडावर आली असताना आशा वर्करना ग्रामीण भागातील विविध कामे दिली होती. सर्वत्र दिवाळीचा उत्साह असताना काम वेळेत झाले नाही तर लाडू आणि चिवडा तोंडातून काढू, असे नायब तहसीलदारांनी सांगितले. तसेच पोलीस बळाचा वापर करण्याचीही धमकी दिली. त्यामुळे कोणत्याही मानधनाशिवाय काम पूर्ण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी कामगार पक्षाने कायमच कष्टकरी, शेतकरी, कामगारांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे. आशा वर्करचे काम मोठे आहे. कोव्हिड काळात त्यांनी जीवावर उदार होऊन केलेले कार्य कौतुकास्पद आहे. आशा वर्कर नसत्या तर कोव्हिड काळातील काम कोलमडले असते. त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात शेकाप निश्‍चितच आवाज उठवेल. तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल.

चित्रलेखा पाटील
जिल्हा महिला आघाडी प्रमुख, शेकाप

संघटित होण्याची गरज
माणसाने माणूसपण टिकविले पाहिजे. पिळवणूक थांबली पाहिजे. अन्यायाविरोधात आवाज उठविताना संघटित राहणे आवश्यक आहे. महिलांमध्ये प्रचंड चिकाटी असते. त्यामुळे आशा वर्करने एकत्र राहून आवाज उठविला पाहिजे. आ. जयंत पाटील यांनी राजकारण न करता अन्यायाविरोधात आवाज उठविला आहे. त्यांच्याकडे आशा वर्करच्या मागणीसाठी चर्चा करुन प्रश्‍न सोडवू, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version