तळीये दरड दुर्घटना- बचाव पथक उशिरा पोहचल्याने दिसल्या आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी

आ. जयंत पाटील यांनी सभागृहात आणले निदर्शनास
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये येथे झालेल्या दरड दुर्घटनेप्रसंगी बचाव पथकाला पोहचण्यास उशिर झाल्याने आपत्ती व्यवस्थापनातील त्रृटी समोर आल्या तसेच या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या सर्व वारसांना तसेच जखमींना शासनातर्फे मदत मिळाली नसल्याची गंभीर बाब शेकापक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
आ. जयंत पाटील यांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे प्रश्‍न उपस्थित करत मौजे तळीये (ता.महाड, जि. रायगड) येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून मृत्यू व जखमी झाल्याची घटना दिनांक 22 जुलै, 2019 रोजी घडली. सदर दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव पथकांना दाखल होण्यास सहा ते चौदा तासांचा कालावधी लागल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी निदर्शनास आल्या.
उपरोक्त दुर्घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच जखमींना शासनातर्फे मदत मिळण्याबाबत तसेच आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी दूर करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात आली याबाबत शासनाकडे माहिती मागितली. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्तर देताना 87 पैकी 82मृतांच्या वारसांना मदत दिली असून 5 नातेवाईकांना मदत मिळाली नसल्याचे मान्य करत या मयत व्यक्तींच्या वारसांमध्ये वाद असल्याने उशिर झाल्याचे स्पष्ट केले. दिनांक 21 व 22 जुलै, 2021 रोजी सकाळपासूनच अतिवृष्टी सुरू असल्याने जिल्हा व स्थानिक प्रशासन, श्री. साळुंखे यांची 2 रेस्क्यु पथके, महेश सानप, कोलाड यांची 3 रेस्क्यु पथके, इंडियन कोस्ट गार्ड, महाड नगरपरिषदेकडील 4 बचाव पथकांकडून बोटींव्दारे जवळपास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. तसेच तळीये येथील 87 मयत व्यक्तींच्या वारसांपैकी 82 व्यक्तींच्या वारसांना रुपये 3 कोटी 28 लक्ष राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून व मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी रुपये 1 लाख अशा एकूण 4 कोटी 90 लाख इतक्या निधीचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित मयत व्यक्तीच्या वारसांमध्ये वाद असल्याने वारस प्रमाणपत्र सादर करण्यास कळविले आहे. त्यानंतर उर्वरित वाटप करण्यात येणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version