नवी मुंबई विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

उंच इमारतींवरील बचावकार्याचे प्रात्यक्षिक; सरावात अत्याधुनिक साधनांचा वापर

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची चाचणी घेण्यासाठी आपत्कालीन मॉक ड्रिल घेण्यात आले. या सरावात चक्रीवादळ परिस्थितीचे अनुकरण करून विविध यंत्रणांनी समन्वयाने आपत्कालीन प्रतिसाद कसा दिला जातो, याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या मॉक ड्रिलमध्ये सिडको, नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, अग्निशामक दल, आग व बचाव सेवा, तसेच वैद्यकीय सेवांमध्ये महाराष्ट्र सरकारची राष्ट्रीय रुग्णवाहिका सेवा, अपोलो हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल, स्वदेश फाऊंडेशन आणि व्हाइट लोटस हॉस्पिटल यांचा सहभाग होता.आपत्कालीन परिस्थितीत तत्पर प्रतिसाद देण्यासाठी विमानतळावरील विमानतळ आपत्कालीन अग्निशमन सेवा (एआरएफएफ) पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. क्रॅश फायर टेंडर (सीएफटी) सारख्या अत्याधुनिक वाहनांच्या सहाय्याने विमान आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये जलद प्रतिसाद कसा दिला जातो, याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. उच्च क्षमतेच्या पाणी, फोम आणि ड्राय केमिकल प्रणालींचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचे कौशल्य दाखवण्यात आले.

घटनास्थळी नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता, जिथून संपूर्ण मोहिमेचे नियंत्रण, संवाद आणि विविध यंत्रणांमधील समन्वय साधला जात होता. बचावकार्या दरम्यान एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर पथकांनी अत्याधुनिक साधनांचा वापर करून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रात्यक्षिक केले. 70 मीटर उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या हायड्रॉलिक यंत्रणेच्या साह्याने उंच इमारतींवरील बचावकार्य प्रभावीपणे पार पाडले गेले.

दोन दिवस चाललेल्या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ.दिनेशकुमार अस्वाल आणि मेजर जनरल अजय वर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या मोहिमेत केंद्र व राज्य शासनाचे विविध विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सशस्त्र दले, केंद्रीय राखीव पोलीस दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि अणुऊर्जा विभागांतील अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या यशस्वी कार्यक्रमात रायगडचे जिल्हाधिकारी किशन जवळे, डॉ. दिनेशकुमार अस्वाल, मेजर जनरल अजय वर्मा, डॉ. विनोद कौशिक, अणुऊर्जा विभागाचे सदस्य सचिव (संकट व्यवस्थापन) सरस सेठ, कोकण विभागीय माहिती प्र.उपसंचालक मनोज सानप, पनवेल उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसिलदार भामरे, डॉ. आनंद गोसावी, अमर सिंग, दीपक तिवारी, अमित कुमार, तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी योगिता गवथे आणि प्रकल्प अधिकारी श्रीदत्त कामत, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी मान्यवरांचा समावेश होता.

Exit mobile version