कर्जतमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत येथील रक्षा सामाजिक विकास मंडळ आणि दहिवली येथील छत्रपती शिवाजी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात 40 नागरिकांनी सहभाग घेतला.

रक्षा संस्थेमार्फत वेळोवेळी विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात येत असते. यावेळी देखील अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर कर्जत मधील व परिसरातील नागरिकांसाठी आपत्ती व सुरक्षा व्यवस्थापन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात कर्जत तालुक्यातील अंबोट, दहिवली गुंडगे, कर्जत, मुद्रे, रामाची वाडी, कडाव, टेंभरे कशेळे, माथेरान तर कर्जत तालुक्याबाहेरील उल्हासनगर, कल्याण येथून 40 नागरिक सहभागी झाले होते.

या प्रशिक्षणादरम्यान मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती आल्यास, म्हणजेच अतिवृष्टी, चेंगराचेंगरी बॉम्ब स्फोट, आग लागणे, पूर येणे, भूकंप हे संकट येण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? संकट आल्यावर कोणती काळजी घ्यावी? व आपत्ती येऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात राम यादव, अमित गुरव यांनी प्रशिक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. हे प्रशिक्षण विना:शुल्क आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी छत्रपती शिवाजी मंडळाचे अशोक शिंदे, दत्तात्रय म्हसे, विनायक गुरव, राजू मोरे, संतोष गुरव व इतर सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version