संशोधक निलेश मोने यांचा पाली तहसीलदारांच्या हस्ते सत्कार
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील सौर ऊर्जेचे गाढे अभ्यासक आणि संशोधक निलेश मोने यांनी बहुपयोगी सोलर ड्रायर बनविला आहे. या सोलर ड्रायर चे पेटंट देखील त्यांनी मिळविले आहे. या मूलभूत संशोधनाबद्दल पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. संशोधक निलेश मोने हे सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा येथील रहिवासी आहेत. एका अभिनव सोलर ड्रायरच्या निर्मिती बरोबरच त्यांनी सौर पथदिवे आदिवासी भागांमध्ये बसवण्याचे काम केले आहे. सौरऊर्जेवर ते अनेक वर्षांपासून काम करत आहेत. पारंपरिक उर्जासाधनांच्या वाढत्या प्रदूषणामुळे व ते अधिक खर्चिक असल्यामुळे सौरऊर्जेसारख्या स्वस्त व प्रदूषणविरहित अपारंपरिक उर्जासाधनांचा वापर वाढावा यासाठी मोने मागील अनेक वर्षे सौरऊर्जेवर संशोधन करून सौरऊर्जेवर चालणारी स्वस्त व टिकाऊ उपकरणे बनवित आहेत. त्यांच्या सत्कारावेळी निलेश मोने म्हणाले की, ही कौतुकाची थाप मला सौर उर्जेवर अभ्यास करण्यास आणखी प्रेरणा देत राहील.
या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून पनवेल येथील उद्योजक आशिष पाटील व मान्यवर उपस्थित होते.शोध