शासनाचा पगार, ‘खासगी’त उपचार
| अलिबाग | प्रमोद जाधव |
‘पगार शासनाचा, उपचार मात्र खासगीत’ अशी अवस्था अलिबागसह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांची असून, त्यामुळे आरोग्याचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयाच्या नावाखाली डॉक्टर रुग्णालयात जात नाहीत. त्यामुळे रुग्णालयांचा दर्जा ढासळला असल्याने जनतेतून खदखद व्यक्त होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना चांगली सेवा मिळावी, म्हणून काही कंत्राटी स्वरुपात डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, यातील काही डॉक्टर मानधन शासनाचे घेत असले, तरी त्यांचे रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. रुग्णालयातील या कारभाराबाबत चर्चेला उधाण आले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक अशा डॉक्टरांच्या कारभाराबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सर्वसामान्य रुग्णांना चांगली सेवा मिळावी, यासाठी रायगड जिल्ह्यात अलिबागमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय, पेण, मुरूड, कर्जत, पेण, माणगाव, रोहा, श्रीवर्धन आदी तालुक्यांमध्ये उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय बांधण्यात आले. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालय 250 खाटांचे आहे.पोलादपूरच्या टोकापासून पनवेल, श्रीवर्धन अशा अनेक भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कार्यरत डॉक्टरांना उपचार करताना अडचणी निर्माण झाल्या.
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयासह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. 168 डॉक्टरांना कंत्राटी स्वरुपात भरती करण्यात आले. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात 28 डॉक्टरांचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या देखरेखेखाली कारभार चालला जातो. शस्त्रक्रियेपासून वेगवेगळ्या उपचाराची माहिती घेऊन दर महिन्याला कंत्राटी डॉक्टरांना मानधन दिले जाते. मात्र, यातील काही डॉक्टर शस्त्रक्रियेपासून बाह्य रुग्ण कक्षातदेखील हजर नसल्याची चर्चा समोर आली आहे.
बाह्यरुग्ण कक्षामध्ये शिकाऊ डॉक्टर अथवा परिचारिकांमार्फत काम चालविले जात आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर नसल्याची चर्चादेखील रुग्णालयांमध्ये सुरू आहे. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सरकारी दवाखान्यात उपचार न देता त्यांना खासगी डॉक्टर त्यांच्या खासगी दवाखान्यात बोलावून उपचार देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनावर लाखो रुपये खर्च केले जातात. मानधन शासनाकडून घेत असताना काही डॉक्टर मात्र त्यांच्या खासगी दवाखान्यातून कारभार चालवित असल्याची माहिती समोर येत आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना बाहेरील खासगी मेडिकलमधील औषधे लिहून दिल्याचा प्रकार मागील काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. हा गोरखधंदा स्थानिकांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या निदर्शनास आणून दिला होता. आता शासनाचे मानधन घेऊन खासगी दवाखाना चालविणाऱ्या डॉक्टरांविरोधात यंत्रणा काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. या डॉक्टरांची नावे लवकरच उघड केली जाणार आहेत.
क्ष-किरण तज्ज्ञ अडचणीत
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाला रुग्णालयातील डॉक्टरांकडून दुय्यम वागणूक देण्यात आली असून, त्यांना धमकाविण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेण्यात आली असून, लेखी स्वरुपात खुलासा मागविण्यात आला आहे. गैरवर्तन केलेले निदर्शनास आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे रेडिओलॉजिस्ट तथा क्ष-किरण तज्ज्ञ अडचणीत येण्याची शक्यता आहे.
जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालयांमध्ये कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. जे कोणी डॉक्टर मानधन घेऊन काम करीत नसतील, त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल. पाहणी करून कार्यवाही करण्यात येईल.
डॉ. निशिकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक
