| अलिबाग | प्रतिनिधी |
बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी भूषण पतंगेचा शुक्रवारी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. तत्पूर्वी, भूषणला अटक झाल्यानंतर त्याची अधिक तपासणी पोलीस ठाण्यातील बालस्नेही कक्षामध्ये सुरु होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक मोरे यांच्याकडे होता. तपासादरम्यान पोलिसांसोबत ‘कादर’नामक व्यक्तीचा हस्तक्षेप होता, अशी चर्चा आहे. पतंगेला पोलिसांसह कादरसुद्धा पोलिसांच्याच पट्ट्याने मारत हिंदीमध्ये विचारणा करीत होता, असे बोलले जाते. त्यामुळे ‘कादर’ नेमका कोण, या प्रकरणाशी त्याचा काय संबंध? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांच्या तपासात आरोपीला दमदाटी का दिली? पोलीस ठाण्यात रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे या ‘कादर’चा पोलीस अधीक्षक आंचल दलाल काय बंदोबस्त करणार, याबाबत त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. तसेच तपासात खासगी व्यक्तीने हस्तक्षेप केल्याप्रकरणी चौकशी केली जाईल का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
कादर हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून, सध्या तो वायशेत येथे वास्तव्यास आहे. कादर हा पोलिसांचा खबरी असल्याचे बोलले जाते. मागील काही वर्षांपासून त्याचा हा धंदा सुरू असल्याचे समजते. त्यामुळे ठिकठिकाणी चालू असलेल्या अवैध धंद्याची माहिती तोच पोलिसांना पुरवत असल्याची माहिती आहे. म्हणूनच तो पोलिसांच्या अगदी जवळचा व्यक्ती असल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याचे अलिबाग पोलीस ठाण्यात येणे, अधिकाऱ्यांशी संवाद साधणे सुरू आहे. पोलीस ठाण्यात एखादे प्रकरण घडले की तो तातडीने तेथे येऊन मध्यस्थी (सेटलमेंट) करण्याचे काम करीत असतो. ‘मी क्राईममध्ये काम करतो’, अशी दहशत त्याने वायशेत व थळ परिसरात निर्माण केली आहे. अनेकवेळा तेथील काही धंदेवाल्यांना धमकाविण्याचे काम करीत असल्याची चर्चा आहे.
कादर हा पोलिसांच्या मदतीने काही गैरप्रकार ही करीत असल्याचीही चर्चा आहे. तरीदेखील त्याला अलिबाग पोलीस ठाण्यात पायघड्या का टाकल्या जात आहेत. सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांना साधे बसण्यासही काही पोलीस देत नाहीत; परंतु कादरला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. मागील काही दिवसांपूर्वी हॉकी स्टीकने एका तरुणाला मारहाण झाली होती. पोलीस ठाण्यात जमाव झाला होता. त्यावेळी पोलिसांच्या सोबत कादरही सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करीत होता, अशी चर्चा आहे. त्यामुळे कादर कायद्यापेक्षा मोठा आणि पोलिसांच्या इतक्या जवळचा का? पोलिसांच्या अशा कोणत्या गोष्टी कादरला माहिती आहेत, की त्या त्याने सांगितल्यास पोलिसांचे बिंग फुटेल, याबाबतही चर्चा सुरू आहे. कादरचा मोठा भाई कोण?, त्याच्यामागील खरा सूत्रधार कोण, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर चांगलाच अंकुश ठेवला आहे. त्यामुळे अवैध धंदा चालविणाऱ्यांना दणका मिळाला आहे. मात्र, अलिबाग पोलीस ठाण्यातील कामकाजात हस्तक्षेप करण्याच्या प्रकाराबाबत अलिबाग पोलीसही चौकशीच्या फेऱ्यात आले असून, त्यांची चौकशी होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भूषण पतंगे हे गेल्या दहा वर्षापासून आजारी होता. त्याला फीट येत होती. जप्त केलेल्या बनावट नोटा खासगी व्यक्तीच्या हातात असल्याचा व्हीडीओ प्राप्त झाला आहे. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कादर यांचा पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप का झाला, याची चौकशी करून हे प्रकरण कायमचे मार्गी लावण्यात येईल.
– आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड
भूषण पतंगे याचा मृतदेह शनिवारी घरी आणला. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. भूषणच्या मृत्यूचे गूढ कायमच आहे. याबाबत योग्य तपास झाल्यास यातील सत्य उघड होईल. तसेच पोलिसांच्या तपासात कोणत्याही खासगी व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
– ॲड. मानसी म्हात्रे, ज्येष्ठ विधीज्ञ







