विधिमंडळात प्रचंड गदारोळ
| नागपूर | प्रतिनिधी |
दिशा सालियनचे प्रकरण मुंबई पोलिसांकडे आहे. याप्रकरणाचे ज्यांच्याकडे पुरावे असतील, त्यांनी द्यावे. यासंदर्भात एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना केली आहे. याबाबतचा मुद्दा शिंदे गटाचे आ. भरत गोगावले यांनी उपस्थित केला होता. त्यावरुन विधिमंडळात प्रचंड गदारोळ झाल्याने कामकाज पाच ते सहावेळ तहकूब करावे लागले.
दिशा सालियन प्रकरणाची चौकशी कधीच सीबीआयकडे नव्हती. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सीबीआय करत आहे. दिशा सालियन प्रकरणात सीबीआयला विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे नाही, असं सांगितलं. त्यासंदर्भात सीबीआयचा कोणताही क्लोजर रिपोर्ट नाही आहे. याबाबत जे काही पुरावे मांडले जात आहेत, त्याच्या आधारावर कोणताही राजकीय आकस न ठेवता, निपक्षपणे चौकशी करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गोगावलेंनी दिशा सालियन आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप करत नाव न घेत आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले होते. दिशाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप उघड झाला नाही. दिशा मृत्यूच्या आधी कोठे होती, त्या ठिकाणी तिच्याबरोबर कोणकोण होते, त्या ठिकाणी काय घटना घडली हे समोर आलेलं नाही. त्यामुळे दिशाच्या मोबाईल आणि व्हॉट्सअॅपची पूर्ण चौकशी व्हायला हवी आणि मृत्यूचं कारण स्पष्ट करून कारवाई करावी. या प्रकरणाची दिल्लीपर्यंत चर्चा आहे. त्याचा खुलासा या सभागृहासमोर व्हावा, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे या प्रकरणाचा फेरतपास होणं गरजेचं आहे, असंही गोगावलेंनी नमूद केलं.