आ.जयंत पाटील यांच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्यांना सरकारने 5439.07 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबतचा लेखी प्रश्न आ.जयंत पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले होते.
मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात असे नमूद केले की, शासन निर्णय, महसूल व वन विभाग, दिनांक 22/08/2022 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा वाढीव दराने 3 हेक्टरच्या मर्यादेत पुढीलप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरीता मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी रुपये 13,600/- प्रति हेक्टर, बागायत पिकांच्या नुकसानीकरीता रुपये 27,000/- प्रति हेक्टर,बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी रुपये 36,000/- प्रति हेक्टर त्यानुसार, चालू हंगामातील अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्राकरीता रुपये 5439.07 कोटी इतका निधीवितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुळ प्रश्ना आ.जयंत पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी राज्यात अतिपर्जन्यवृष्टी, परतीचा पाऊस, महापूर व ढगफुटीमुळे माहे जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत 34 जिल्ह्यांतील 38 लाख 44 हजार 826 हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले असून कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र मुसळधार पाऊसामुळे शेतकर्यांच्या सोयाबीन, कापूस, भात, भुईमूग, धान, कडधान्य, भाजीपाला, फळपिकांचे, बागायतदार शेतकर्यांचे, मच्छिमारांचे, घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाल्याचे माहे ऑक्टोबर, 2022 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना कोणत्याही अटी व निकष न लावता सरसकट शासकीय आर्थिक मदत देण्याची मागणी परभणी जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकर्यांच्या कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला असून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकर्यांच्या पिकांचे शासनाने पंचनामे/पाहणी/चौकशी केली आहे काय, राज्यातील शेतकर्यांचे किती रुपयांचे नुकसान झाले आहे, नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनाने हेक्टरी किती आर्थिक मदत जाहीर केली आहे,अशी विचारणा आमदारांनी सभागृहात केली.
अतिवृष्टीमुळे 6 लाख 34 हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले असून 19 जिल्ह्यातील मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडून मदत व पुनर्वसन विभागाला माहे ऑक्टोबर, 2022 अखेर पर्यंत प्राप्त झालेले नाहीत तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणार्या शेतकर्यांना रुपये 755 कोटींचा निधी वितरित करण्याबाबतचा निर्णय विशेष बाब म्हणून मा.मंत्रिमंडळ उप समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून सदरहू शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने निकषात न बसणार्या शेतकर्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नाही,असेही निदर्शनास आणण्यात आले आहे.याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा न करणार्या व कर्तव्यात कसूर करणार्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर कारवाई करुन शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,याची माहिती दिली जावी,अशी सुचनाही या आमदारांनी केली होती.