गितेंच्या ठिणगीनंतर शिवसेनेत वणवा

रायगडमध्ये गुप्त बैठकीत राष्ट्रवादीसोबत कधीच आघाडी नकोचा सुर
तटकरेंकडून शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याच्या तक्रारी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वारंवार शिवसेनेला फाटयावर मारण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधात शिवसेने असंतोष शिवसेना नेते अनंत गिते यांच्या जाहिर विधानानंतर पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गिते यांनी श्रीवर्धनमध्ये टाकलेल्या ठिणगीचे रुपांतर वणव्यात होत असून यापुढे कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी नकोच असा सुर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी लावण्यास सुरुवात केली आहे. शिवसैनिकांची मतं जाणून घेण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील शिवसेना आमदार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची गुप्त बैठक आज माणगावमध्ये पार पडली. त्यावेळी सर्वच पदाधिकार्‍यांनी आपली कैफियत मांडताना गितेंचीच रि ओढली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात आघाडी असली तरी जिल्ह्यात बिघाडीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
माणगावमध्ये पार पडलेल्या या बैठकीला उपस्थित बहुतेक पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात सूर आळवला. आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असूनदेखील शिवसेनेला जिल्हयात योग्य सन्मान मिळत नाही. तटकरे हे शिवसेनेचे खच्चीकरण करत आहेत. जिल्हा नियोजन समितीमधील निधी वाटपातही सवतासुभा होत असल्याची तक्रार यावेळी देसाई यांच्याकडे करण्यात आली.
शिवसेनेकडून आघाडी धर्माची अपेक्ष ठेवली जाते. मात्र, राष्ट्रवादीकडून आघाडीचा धर्म पाळला जात नाही. प्रत्येक ठिकाणी सेनेला दडपण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आगामी काळात येणार्‍या निवडणूका स्वबळावर लढण्याचा आग्रह या बैठकीत धरण्यात आला. या बैठकीला सुनील तटकरे यांचे बंधू माजी आमदार अनिल तटकरे, यांच्यासह आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, मनोहर भोईर उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलण्यास सुभाष देसाई यांच्यासह पदाधिकार्‍यांनी नकार दिला. ही बैठक आगामी निवडणूकांवर चर्चा करण्यासाठी होती अशी सारवासारव करण्यात आली.

Exit mobile version