| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्याजवळील शिहू (ता. पेण) येथील शेतात असलेल्या ओहोळाच्या बांधकामावरून भांडण होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाल्याने शिहू येथील चार जणांवर नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शिहू येथे शनिवारी (दि.11) सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास या घटनेतील तक्रारदार द्वारकानाथ काशिनाथ म्हात्रे यांच्या आईच्या घरासमोर घडली आहे.
या घटनेतील तक्रारदार द्वारकानाथ म्हात्रे व चार आरोपी यांच्यात शेतीच्या ओहोळच्या बांधकामावरून शेतावर बोलचाली झाली होती. त्यामुळे त्या रागातून आरोपी क्रमांक दोन यशवंत म्हात्रे याने तक्रारदार यांचे आईला घराबाहेर ओढले. तसेच आरोपी क्रमांक तीन संकेत यशवंत म्हात्रे हा कोयता घेऊन तक्रारदार यांच्या अंगावर धावत आला. तो कोयता पकडल्याने तक्रारदार यांस दुखापत झाली. तसेच आरोपी क्रमांक एक ते तीन यांनी तक्रारदार व त्यांच्या मुलास काठीने मारहाण करून दुखापत करून आरोपी क्रमांक दोन ते चार यांनी तक्रारदार यांचा मुलगा विशाल याच्या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. याप्रकरणी आरोपी क्र.1) भारतीय यशवंत म्हात्रे, 2) यशवंत बाळाराम म्हात्रे, 3) संकेत यशवंत म्हात्रे व 4) सानिका यशवंत म्हात्रे, सर्व रा. शिहू (ता. पेण) यांच्याविरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोटीराम पावरा हे करीत आहेत.
शेतातील ओहोळाच्या बांधकामावरून भांडण; चौघांवर गुन्हा दाखल
