वृद्धाच्या डोक्यात दगडाने प्रहार
| पेण | प्रतिनिधी |
करंबेळीवाडी येथे कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत वृद्धाच्या डोक्यात दगडाने प्रहार करून दुखापत केल्याची घटना 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेतावरून घरी परतले असता त्यांचा मुलगा, सून आणि नातवाला आरोपींनी हाताबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. यावेळी नातवाला खाली पाडून त्याच्या पाठीवर व पायावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली जात होती. तक्रारदार भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपी क्रमांक दोन व चार यांनी त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. त्यानंतर तक्रारदार यांचे लक्ष नसताना आरोपी क्रमांक एक ने हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात दोन ते तीन वेळा प्रहार केला. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक फौजदार राजेश माने करीत आहेत.






