| दिघी | प्रतिनिधी |
दिघी सागरी पोलीस ठाण्यात दहीहंडी, ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.23) शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी व उपनिरीक्षक भास्कर गच्छे यांनी परिसरातील परिस्थितीचा आढावा घेत सण-उत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा राखून साजरे करण्याचे आवाहन केले.
यावेळी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम तसेच परिसरातील विविध स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत मोकाट गुरांचा प्रश्नही ऐरणीवर आला. गावातील रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी मोकाट गुरांमुळे नागरिकांना त्रास होत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताची शक्यता वाढत असल्याची बाब उपस्थित करण्यात आली. या समस्येवर ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेण्याचे यावेळी ठरविण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येणार आहे. या बैठकीला परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध समाजांचे अध्यक्ष, उत्सव कमिटीचे सदस्य, पोलीस पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.






