| मुंबई | प्रतिनिधी |
यंदाच्या गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवायला कोणतीही बंदी नाही, मात्र या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावं, असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानपरिषदेत केलं. यासाठी कृत्रिम तलावांची पुरेशी सोय प्रशासनामार्फत करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. याबाबतची लक्षवेधी शेकापचे आ.जयंत पाटील यांनी मंगळवारी (दि.25) विधानपरिषदेत उपस्थित केली होती. यावर हा निर्णय घेण्यात आला.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर सरसकट बंदी घालू नये, यामुळं मूर्ती तयार करण्याच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना फटका बसत आहे, अशी मागणी शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे केली होती, त्याला केसरकर उत्तर देत होते. मूर्तींवर वापरल्या जाणाऱ्या रंगांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील, असंही केसरकर यांनी यावेळी सांगितलं.
या लक्ष्यवेधीवर बोलताना जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यात पेणमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींची निर्मिती केली जाते. दरवर्षी कोट्यवधींचा व्यवसाय चालतो. लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे. या परिसरात दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या लाखो गणेशमूर्तींची निर्मिती होत असते. शासनाने या पीओपी मुर्तींवर बंदी घातल्याने तयार केलेल्या मूर्तींचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवाय याचा मोठा फटका या व्यावसायिकांना बसणार आहे. सध्या पावसाळाही सुरु आहे. आणखी दोन महिन्यांनी गणेशोत्सव सुरु होणार आहे. अशा परिस्थितीत सरकारने पीओपीच्या गणेशमुर्तींवर घातलेली बंदी उठवावी, अशी जोरदार मागणी जयंत पाटील यांनी सरकारकडे केली.