मिठाई विक्रेत्यांकडून आदेशाची पायमल्ली

| उरण | वार्ताहर |

सणांचे दिवस सुरू असल्याने मिठाईची मागणी वाढली आहे. या काळात खुल्या मिठाईच्या पदार्थात भेसळ होण्याची शक्यता असल्याने शासनाने खुल्या मिठाई विक्रेत्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत,मात्र उरणमधील मिठाई विक्रेते या आदेशाची पायमल्ली करत मिठाई विक्री करत आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई होताना दिसत नाही.

शहरात व तालुक्यातील परिसरात खाद्य पदार्थात मोठया प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. सध्या सणासुदीच्या दिवसात मिठाईमध्ये भेसळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे भारतीय खाद्य सुरक्षा तथा मानक प्राधिकरण भारत सरकार यांनी खुली मिठाई विकताना तयार उत्पादन आणि मुदतीचा कालावधी बंधनकारक केला आहे. भेसळयुक्त पदार्थ आणि अन्नातून होणारी विषबाधा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. असे असतानाही उरण शहर व तालुक्यातील मिठाई विक्रेते हा नियम पाळत नाहीत. यात स्थानिक अन्न व औषध प्रशासनाकडून या संर्दभात कोणताही कारवाई केली जात नाही.

उत्पादन आणि वैधतेची कोणतीही माहिती मिळत नसल्याने मिठाई ताजी आहे की नाही हे समजणे कठीण होते. आणि अशी मिठाई खाल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो. यामुळे त्यावर उत्पादनाची तारीख आणि वापराचा कालावधी नमूद करणे आवश्यक आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याने भेसळखोर सक्रिय झाले आहेत. तर दुसरीकडे मिठाई विक्रेते सदरच्या नियमाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगत आपली बाजू सांभाळत आहेत. पण यात सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Exit mobile version