पुन्हा नव्याने निविदा काढून ठेकेदार नियुक्त केला जाणार
| अलिबाग | प्रमोद जाधव |
तालुक्यातील उसर येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचा भूमीपूजन सोहळा 22 फेब्रुवारी 2022 रोजी मोठ्या थाटामाटात झाला. मात्र, भूमीपूजन होऊन एक वर्ष उलटूनही अद्यापही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. त्यात ज्या कंपनीला काम दिले होते, त्या कंपनीचे काम रद्द करून नव्याने निविदा काढून काम केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या महाविद्यालयाच्या कामाला खोडा आल्याने रायगडकरांचे स्वप्नपूर्ती लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
अलिबाग या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. मात्र, त्याठिकाणी सुविधांचा अभाव, डॉक्टरांची कमतरता, अपुरे मनुष्यबळ अशा अनेक समस्यांमुळे रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईला जावे लागते. त्याचा आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना कायमच सहन करावा लागत आहे. अलिबाग या ठिकाणी अद्ययावत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असावे, हे स्वप्न गेल्या अनेक वर्षांपासून रायगडकरांसह अलिबागकरांचे होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्याच्या मार्गावर होते. उसर येथील 35 एकर क्षेत्रातील जागेत हा प्रकल्प उभारला जाणार आहे. 450 कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये संरक्षित भिंत, शंभर एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 500 खाटांचा दवाखाना, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसाठी वसतिगृह अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. त्याची मान्यता राज्य, केंद्र स्तरावर मिळाल्यानंतर इपीआय (इंजिनिअरिंग प्रोजेक्ट ऑफ इंडिया) या कंपनीकडे प्रकल्पाचे काम सोपविण्यात आले.
22 फेब्रुवारी 2022 रोजी या प्रकल्पाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. लवकरच अलिबागमध्ये अद्ययावत असे रुग्णालय उभे राहणार असल्यानेे अलिबागकरांसह संपूर्ण रायगडकरांच्या आशा पल्लवीत झाल्या. नेमलेल्या एजन्सीद्वारे कामाला सुरुवातही करण्यात आली. सुरुवातीला काम करताना अडथळे निर्माण झाले होते. पोलीस बंदोबस्तामध्ये कामाला प्रत्यक्षात सुरुवात होऊन संरक्षित भिंत उभारणीसाठी गेल्या सहा महिन्यांपूर्वी खोदकाम सुुरू झाले होते. मात्र, पुन्हा या कामला ब्रेक लागला. इआयपी या एजन्सीचे काम अनियमिततामुळे बंद केल्याची माहिती अधिष्ठाता कार्यालयाकडून देण्यात आली. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम थांबले आहे. रद्द केलेल्या एजन्सीच्या जागी दुसरी एजन्सी नेमण्यासाठी पुन्हा नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. भूमीपूजन होऊन एक वर्ष, तीन महिने व 26 दिवस उलटूनदेखील अजूनपर्यंत प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्याने रायगडकरांची निराशा झाली आहे. शासकीय वैद्यकीय कधी उभारणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.