निर्बंधांमुळे राज्यभरात व्यापार्‍यांमध्ये असंतोष

दुकानांची वेळमर्यादा वाढविण्याची मागणी
। पुणे/ठाणे । वृत्तसंस्था ।
राज्यात पुन्हा सोमवारपासून दुकाने आणि अन्य सेवांच्या वेळेत बदल झाल्याने व्यापार्‍यांमध्ये असंतोष पसरला आहे. निर्बंधांचा खेळ बंद करावा, अशी मागणी करीत पुणे, ठाणे, कोल्हापूरसह विदर्भातील व्यापार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राज्यातील बहुतांश ठिकाणी स्तर तीनचे निर्बंध पुन्हा लागू झाल्याने अत्यावश्यक वगळता अन्य दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 4 अशी झाली आहे. या वेळगोंधळाचा फटका व्यापारी, ग्राहक आणि उद्योगजगतालाही बसत आहे. वेळांमध्ये करण्यात आलेल्या बदलांवर व्यापारी वर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दुपारी चापर्यंतची वेळ गैरसोयीची असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

निर्बंधांमुळे व्यापारी आणि राज्य सरकार दोघांचे नुकसान आहे.नव्या निर्बंधांवरून कोल्हापूरमध्ये सोमवारी व्यापारी आणि प्रशासन यांच्यात संघर्ष उडाला. अखेर प्रशासनाने विनंती केल्यावर दोन दिवसांसाठी व्यवसाय बंद ठेवण्याचे व्यावसायिकांनी मान्य केले. मात्र, या काळात निर्बंधांचा फेरविचार न केल्यास 1 जुलैपासून दुकाने सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला.राज्य सरकार ऊठसूट निर्बंध लागू करून आमच्या भविष्याशी खेळत आहे, असा सूर विदर्भातील व्यापार्‍यांमध्ये उमटला. नागपुरात गेल्या महिन्यापासून करोना आटोक्यात आहे. मात्र, पुन्हा निर्बंध लागू करून आमचा व्यवसाय धोक्यात आणला जात आहे. आधीच व्यवसाय होत नाही. त्यात आणखी निर्बंध घातल्याने व्यापार्‍यांची अवस्था वाईट झाली आहे. सरकारने आमच्या दुकानाचे निम्मे भाडे, बँकेचे हप्ते आणि वीज देयकही निम्मे माफ करावे, अशी मागणी विदर्भातील व्यापार्‍यांच्या शिखर संघटनेचे अध्यक्ष अश्‍विन मेहाडिया यांनी केली.

Exit mobile version