। पोलादपूर। प्रतिनिधी ।
शहरातील अमरनगर येथील शहीद राकेश तात्याबा सावंत यांचा तेरावा स्मृतीदिन येत्या सोमवार, दि. 6 जून रोजी साजरा करण्यात येणार आहे. शहीद सावंत यांचे शेताच्या बांधावरून पार्थिव महामार्गालगतच्या स्मशानभूमीपर्यंत नेताना प्रशासनाने शहीद सावंत यांच्या घरापर्यंत रस्ता करून देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप अपूर्णच असल्याने शहीद कुटुंबियांमध्ये नाराजी दिसून येत आहे. पोलादपूर शहरातील शहीद राकेश सावंत यांचा देशसेवेदरम्यान झालेल्या वीरमरणानंतर तत्कालीन आमदार स्व. माणिकराव जगताप, तत्कालीन जि.प. सदस्य व विद्यमान आमदार भरत गोगावले तसेच माजी मंत्री स्व. प्रभाकर मोरे आदींनी शहीद कुटुंबियांच्या घरापर्यंत रस्ता करण्याची ग्वाही देऊन प्रशासनाला आदेश दिले होते. मात्र, तेव्हापासून आजतागायत यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने वीरपिता तात्याबा सावंत आणि कुटुंबियांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
सोमवार, दि. 6 जून रोजी सकाळी मुर्तीपूजन झाल्यानंतर तुर्भे येथील ह.भ.प.हरीभाऊ शिंदे महाराजांची किर्तनसेवा होणार आहे. यावेळी श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाला आ. भरत गोगावले, राजिप माजी सदस्य चंद्रकांत कळंबे, पं.स. सभापती नंदा चांदे, उपसभापती शैलेश सलागरे, तहसीलदार दीप्ती देसाई, माजी नगराध्यक्षा सुनिता पार्टे, सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव, नगराध्यक्षा सोनाली गायकवाड, काटेतळी येथील कॅप्टन दत्ताराम मोरे आणि शहरप्रमुख सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.