। पोलादपूर । प्रतिनिधी ।
नगरपंचायतीच्या अखत्यारीतील सावंतकोंड पार्टेकोंडदरम्यानचा जुना लोखंडी पूल दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेल्यानंतर एफआयआर दाखल झाली. मात्र, चोरांना अटक करण्यात चालढकल होऊन या लोखंडी पुलाचे भग्नावशेष घटनास्थळी टाकण्यात आले. त्यानंतर काँग्रेस शहराध्यक्ष अमोल भुवड यांनी या प्रकरणी आरोपींना अटकेच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सोमवारी याच सावंतकोंड पार्टेकोंड प्रभाग क्रमांक 1 मधील नळपाईपलाईन कापून चोरीला गेल्याने अमोल भुवड हे आज शनिवार, दि. 4 जून रोजी उपोषणास बसणार आहेत. यासंदर्भातील नोटीसा भुवड यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यासह रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हाधिकारी, महाड प्रांताधिकारी आणि पोलादपूर तहसीलदार यांनाही दिल्या आहेत.
पोलादपूर तालुक्यातील जुन्या व नव्या लोखंडी चीजवस्तूंच्या चोरीसाठी भंगारमाफियांनी राजकीय व्यक्तींच्या मदतीने जोरदार मोहीम उघडली असून, पोलादपूर तालुक्यात झालेल्या विकासकामांतील चोर्यांबाबत कोणताही आवाज उठविला जात नव्हता. दोन महिन्यांपूर्वी 4 ते 7 एप्रिलदरम्यान पोलादपूर शहरातील सावंतकोंड ते पार्टेकोंडदरम्यानचा साधारणपणे 50 ते 60 फूट लांबीचा व 8 फूट रूंदीचा लोखंडी पुल कापून चोरण्यात आल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे विरोधी गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. या चोरीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचा आरोप यावेळी विरोधी गटाकडून उघडउघड होत आहे.
या चोरांविरूध्द कायदेशीर कारवाई होण्यासाठी पोलादपूर शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल भुवड यांनी नुकताच दि. 21 मे रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असताना दोनच दिवसांत दि. 23 मे रोजी याच सावंतकोंड पार्टेकोंड प्रभाग क्रमांक 1 मधील नळपाईपलाईन कापून चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने संतप्त काँग्रेसजनांनी याप्रकरणी लोखंडी पूल आणि नळपाणी योजनेचे पाईप चोरणार्यांना तातडीने अटक न केल्याने शनिवार, दि. 4 जून रोजी पोलादपूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.