राष्ट्रवादी विरोधातील नाराजीच रायगडातील बंडखोरीचे मुळ

। अलिबाग । भारत रांजणकर ।
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमध्ये रायगडमधील तीनही सेना आमदार सहभागी झाल्याने मोठा धक्का बसला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील नाराजीच या बंडाद्वारे समोर आली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पालकमंत्री हटाव मोहिमेकडे पक्षनेतृत्वाने केलेल्या दुर्लक्ष हीच या बंडखोरीचे मुळ असल्याचे शिवसेनेच्या वर्तृळातून उघड उघड बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर गेल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या राज्यातील असलेल्या आमदारांमध्ये रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच्या सर्व आमदार यात महाडचे भरत गोगावले, अलिबागचे महेंद्र दळवी आणि कर्जतचे महेंद्र थोरवे हे देखील संपर्काबाहेर आहेत. त्यामुळे या बंडखोरीत या तिघांचाही समावेश आहे. हे तिनही आमदार बंडखोरीत सहभागी होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गल्या अडीच वर्षातील नाराजीच कारण ठरली आहे. या तिन्ही आमदारांनी सुरुवातीपासून वारंवार राष्ट्रवादीविरोधातील आपली नाराजी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री असल्याने त्यांनी विरोध करत त्यांना हटवून तिथे पक्षाचा पालकमंत्री द्यावा अशी मागणी अनेकदा केली होती. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन या आमदारांनाच समज देण्या पलिकडे काहीही केले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आमदारांना शांत रहावे लागले होते. हीच नाराजी एकनाथ शिंदेंसोबत जाण्यासाठी कारणीभूत ठरली. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावरील नाराजीमुळे शिवसेनेच्या तीन आमदारांनी अलिबाग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमीपूजन समारंभाला गैरहजेरीदेखील लावली होती. शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटवा, अशी माणगी केली होती. कोणीही द्या, पण रायगडला शिवसेनेचा पालकमंत्री द्या अशी मागणी त्यांनी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांच्या मागणीची अद्याप फारशी दखल घेतलेली नव्हती. शिवसेनेच्या गोटात देखील या बंडखोरीचे एकप्रकारे स्वागत करताना राष्ट्रवादी नसेल तर आम्हाला कोणीही चालेल अशी भावना व्यक्त केली आहे.

Exit mobile version