तिघांच्या विरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलनाची तयारी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेनेजवळ प्रतारणा करीत बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना साथ देणार्या रायगड जिल्ह्यातील आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी यांच्या विरोधात शिवसेनेत नाराजीचे वातावरण पसरत आहे. सुरुवातीला आपण पक्षासोबतच ठाम आहोत असे सांगणारे हे आमदार आता मात्र शिंदे यांनाच साथ देत पक्षासोबत गद्दारी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन यांनी कृषीवल जवळ बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्तेसाठी पक्षाशी गद्दारी शिवसेनेत कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. जिल्ह्यातील शिवसैनिकांची निष्ठा शिवसेनेसोबतच ठाम असेल. वेळ पडल्यास या आमदारांना शिवसेना स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या राज्यातील असलेल्या आमदारांमध्ये रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच्या सर्व आमदार यात महाडचे भरत गोगावले, अलिबागचे महेंद्र दळवी आणि कर्जतचे महेंद्र थोरवे हे देखील सोबत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या बंडखोरीत या तिघांचाही समावेश आहे. कालपर्यंत या तिघांनी आपण शिवसेनेसोबत असल्याचे आम्हाला सांगितले असे शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी सांगितले. मात्र आज प्रत्यक्षात चित्र समोर आल्यानंतर या आमदारांनी बंडखोरी करीत पक्षाविरोधात कारवाई करीत असल्याचे समोर आले आहे. हे पुर्णपणे चुकीचे आहे. पक्ष संघटना महत्वाची असून ज्या पक्षाने महत्वाची पदे दिली त्याच पक्षासोबत गद्दारी करणे चुकीचे आहे. सुरुवातीला आमचा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आम्ही शांत होतो. मात्र आता या तीनही आमदारांनी गद्दारी करुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दुखावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या आमदारांविरोधात आम्ही वेळ पडल्यास रस्त्यावर उतरुन शिवसेना स्टाईलने आंदोलन करुन धडा शिकवू असा इशारा देखील जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे हे या राजकीय घडामोडी दरम्यान मातोश्री वरच आहेत. आम्ही शिवसैनिक असून पक्षासोबतच ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाविरोधात गद्दारी करणे योग्य नाही. आम्ही शिवसेनेशी प्रतारणा करणार्यांची साथ कधीच देणार नसल्याचे सुरेंद्र म्हात्रे यांनी बजावले आहे. तर जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी देखील नाराजी व्यक्त करताना पक्षहितालाच प्राधान्य दिले पाहिजे. आपले म्हणणे जे काही असेल ते पक्षप्रमुखांसोबत मांडायला हवे होते. अशा प्रकारे पक्षासोबत गद्दारी करणे अयोग्यच आहे. या आमदारांसोबत शिवसैनिक कधीच जाणार नाही असेही त्यांनी सांगितले.