पास सक्तीविरोधात नाराजी

रोहा | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी यांनी रोहा-दिवा मेमू लोकल सेवा गणेशोत्सवापूर्वी सुरू करावी यासाठी आवाज उठवला होता. अखेर दिवाळीच्या सणापूर्वी मेमु सेवा सुरू झाली असली तरी मासिक पास सक्तीचा करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रोहा-दिवा मेमू गाडीने प्रवास करण्यासाठी मासिक पास काढणे गरजेचा असून, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र व आधारकार्ड प्रवासादरम्यान तसेच पास काढण्यासाठी सोबत ठेवावे लागणार आहे. रोहा-दिवा मासिक पाससाठी 180, तर रोहा-पनवेल मासिक पाससाठी 210 रुपये मोजावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कामानिमित्त केव्हा तरी पनवेल , मुंबई, रोहा बाजूकडे प्रवास करू इच्छिणार्‍या प्रवाशांना यामुळे महिन्यातून एक दिवस प्रवास करण्यासाठीदेखील मासिक पास घ्यावा लागणार असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तरी मासिक पास निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी जनतेची मागणी असल्याचे मत गणेश मढवी यांनी व्यक्त केले आहे.

Exit mobile version