शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा शेकापकडे वारसा- चित्रलेखा पाटील

। रोहा । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष हा शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा पक्ष असून सामाजिक दायित्व निभावण्यासाठीच सीएफटीआय संस्थेच्या माध्यमातून शेकाप जिल्ह्यातील गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप उपक्रम राबवित असल्याचे प्रतिपादन महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी चणेरा न्यू इंग्लिश स्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर शेकाप नेते पंडित पाटील,माजी सभापती लक्ष्मण महाले,जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक गणेश मढवी,हेमंत ठाकूर,शाळेचे मुख्याध्यापक जोंधळे सर यांच्यासह विभागातील सरपंच, उपसरपंच, ग्राप सदस्य व कार्यकर्ते तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांसमोर बोलताना त्या म्हणाल्या की, शेकापने नेहमीच सामान्य व गोरगरीब जनतेच्या हिताचे राजकारण केले आहे. गोरगरीब जनतेची मुले शिकली पाहिजेत या हेतूने स्व.प्रभाकर पाटील ( भाऊ) ,लोकनेते अ‍ॅड.दत्ता पाटील ( दादा) तसेच आ. जयंत पाटील यांनी जिल्ह्यात शाळा काढल्या. बहुजन समाजातील मुलांसाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच महाविद्यालयांची उभारणी केली. यामुळे जिल्ह्यातील अनेक जण आज पदवीधर झाले असून अनेकांनी पदव्युत्तर शिक्षण देखील घेतले आहे.असे त्या म्हणाल्या.

यावेळी बोलताना पंडित पाटील म्हणाले की, सायकल वाटप कार्यक्रमातंर्गत आज पर्यंत सुमारे 15 हजार सायकलींचे जिल्ह्यात वाटप करण्यात आले आहे. चित्रलेखा पाटील यांचा हा उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद आहे. जनतेने देखील आपल्या संकटात जी व्यक्ती ,पक्ष आपल्या बरोबर उभा राहिला त्याची जाणीव मतदान करताना ठेवली पाहिजे.जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात शेकापचे योगदान मोठे आहे.असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

115 सावित्रीच्या लेकींना सायकली
ग्रामीण भागातील मुलींना शाळेत येताना भरपूर अंतर चालत यावे लागते.यामध्ये त्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाया जातो तसेच चालत येत असताना मुलींना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते.यासर्व बाबींचा विचार करून एक कर्तव्य म्हणून सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या उपक्रमांतर्गत चणेरा विभागातील 115 विद्यार्थिनींना सायकल वाटप करत असताना अतिशय आनंद होत असून यामध्ये स्थानिक शेकाप कार्यकर्ते व सीएफटीआय टीमचे मोलाचे योगदान आहे अशा भावना चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केल्या.

निवडणुका आल्या की पांढरे कपडे घालून आणि डोळ्याला गॉगल लावून अनेक बगळे, कावळे या भागात येतील. पण कोरोना संकट असो किंवा गावातील एखादी समस्या असो ती सोडवण्यासाठी मात्र शेकापची आठवण करावी लागते.

पंडित पाटील,शेकाप नेते
Exit mobile version