पंचायत समिती सेस फंडातून राबविली योजना
। उरण । वार्ताहर ।
पशुसंवर्धन विभाामार्फत उरण तालुक्यात ग्रामीण भागातील महिलांसाठी 50 टक्के अनुदानावर महिला सक्षमीकरण योजना राबविण्यात आली. पंचायत समिती सेस फंडातून गटविकास अधिकारी समीर वाठरकर यांच्या मार्गदर्शनाखाली योजना राबविण्यात येत आहे. दरम्यान, महिलांना कुक्कुटपालनासाठी पिल्लांचे वाटप करण्यात आले.
मागील तीन-चार वर्षांपासून ग्रामीण भागातील महिलांकडून कुक्कुट पिल्लांच्या योजनांची मागणी होत होती. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने कुक्कुट पिल्लांसाठी उरण तालुक्यातून अर्ज मागविले होते. प्राप्त झालेल्या एकूण 76 अर्जांपैकी 50 लाभार्थ्यांची निवड झाली. या लाभार्थ्यांसाठी प्रत्येकी 60 पिल्लांप्रमाणे शासकीय अनुदानातून एकूण 3000 पिल्लांचे आरक्षण केंद्रीय कुक्कुट विकास संस्था, गोरेगाव-मुंबई येथे करण्यात आले. पहिल्या टप्प्यात मंगळवारी (दि. 7) 25 लाभार्थ्यांना प्रत्येकी साठ पिल्ले वाटप करून संगोपनाचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. सोमनाथ भोजने यांनी सांगितले. उर्वरित दुसर्या टप्प्यात येत्या मंगळवारी चिरनेर व विंधणे भागातील लाभार्थ्यांना पिल्लांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान पिल्लांचे खाद्याचे नियोजन, थंडीपासून संरक्षण होण्यासाठी ब्रुडर व्यवस्था तसेच लसीकरण इत्यादींची माहिती लाभार्थ्यांना देण्यात आली. लाभार्थ्यांनी गरजेनुसार उपचार व लसीकरणासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.